Marathon Competition: रांजणगाव गणपती (ता. शिरूर, जि. पुणे) येथे दि. ०१ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य धू पर्यावरण संवर्धन व आरोग्य जनजागृतीचा संदेश देणाऱ्या भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. आर. एम. धारिवाल फाउंडेशन व महागणपती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २०१८ पासून सुरू असलेल्या या उपक्रमाचे यंदा ९वे वर्ष होते. सकाळी ६:०० वाजता स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी धारिवाल फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई धारिवाल उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ जाधव तसेच पुनीतदादा बालन, बालन ग्रुपचे सर्वेसर्वा यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून सुमारे ३५०० स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्पर्धकांनी ३ किमी व ५ किमी अशा दोन गटांत धावत मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण केली. स्पर्धेदरम्यान झुंबा डान्सद्वारे सहभागींचे मनोबल वाढविण्यात आले. तसेच शोभाताई धारिवाल प्री-स्कूल, रांजणगाव गणपती येथील विद्यार्थ्यांनी स्केटिंगच्या आकर्षक सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकत वृक्षलागवडीचा संदेश प्रभावीपणे दिला. अध्यक्षीय भाषणात शोभाताई धारिवाल यांनी आरोग्य संवर्धन, नियमित व्यायाम, वृक्षलागवड आणि प्राणवायू देणाऱ्या झाडांचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. लहान मुले तसेच युवक- युवतींमध्ये निरोगी जीवनशैली रुजविण्यासाठी व्यायामाची गरज त्यांनी अधोरेखित केली. यावेळी अभिनेते सिद्धार्थ जाधव यांनी आपल्या मनोगतातून स्पर्धकांशी संवाद साधत व्यायामाचे महत्त्व पटवून दिले तसेच आई-वडिलांचा आदर करणे व विश्वासार्ह जीवन जगणे यासारख्या मूल्यांवर भर दिला. स्पर्धेतील विजेत्यांमध्ये ५ किमी गटात मुलांमध्ये मोनु कुमार (जळगाव) तर मुलींमध्ये शिवानी दिवाकर (सातारा) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ३ किमी गटात मुलांमध्ये आकाश राठोड (अमरावती) व मुलींमध्ये आदिती हरगुडे (पुणे) यांनी प्रथम स्थान मिळविले. यावेळी गणेगाव खालसा येथील ग्रामस्थांकडून शोभाताई धारिवाल यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सुहास बांगर, अमोल वर्पे, सागर पिंगळे, राजेश काळे, किरण पिंगळे उपस्थित होते. कार्यक्रमास युवासेना प्रमुख बापूसाहेब शिंदे, मा. पंचायत समिती सदस्य विक्रमदादा पाचुंदकर, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन राजेश लांडे, संचालक काळुराम पाचुंदकर, पोलीस उपनिरीक्षक तिडके साहेब, पासलकर साहेब, रांजणगाव एमआयडीसीचे कनिष्ठ अभियंता भूषण ठाणगे, सामाजिक कार्यकर्ते नामदेव पाचुंदकर, पाराजी पाचुंदकर, महागणपती देवस्थान ट्रस्टचे सचिव तुषार पाचुंदकर, ग्रामपंचायत सदस्य गणेश पाचुंदकर, अतिश राऊत, तसेच आर. एम. डी. स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे डायरेक्टर योगेश पाचुंदकर यांच्यासह मोठ्या संख्येने स्पर्धक, ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक व पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सूत्रसंचालक निलेश पडवळ यांनी केले, तर मॅरेथॉनचे आयोजक सागर पाचुंदकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या उपक्रमाच्या माध्यमातून आर. एम. धारिवाल फाउंडेशन समाजात आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकी यांची जाणीव दृढ करण्यासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले.