रणजितसिंहांच्या विजयाने रामराजेंच्या अडचणीत वाढ

श्रीकांत कात्रे

व्यूहरचना यशस्वी करीत माढ्यात भाजपने खेचून आणला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गड

माण-फलटणला कलाटणी?

मोदी लाटेतही विजयसिंह मोहिते पाटील यांना विजय मिळवित माढा राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवला होता. यावेळी मतदारसंघातील भाजपच्या विजयापेक्षाही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय फलटण व माण मतदारसंघातील राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार आहे. माणमध्ये कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी उघडपणे निंबाळकर यांच्या प्रचाराची सुत्रे पार पाडली. त्यांचे बंधू व पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शेखर गोरे यांनीही भाजपलाच ताकद दिली. प्रभाकर देशमुख यांना यापुढे माणमध्ये राष्ट्रवादीसाठी एकाकी झुंज द्यावी लागण्याची चिन्हे आहेत. फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांच्या स्थानिक राजकारणाला वेळोवेळी शह देऊ पाहणाऱ्या रणजितसिंह यांनी या विजयामुळे राजेगट आणि राष्ट्रवादी कॉंग्रसपुढे प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे.

सातारा – महाराष्ट्रात प्रतिष्ठेची बनलेली माढ्याची जागा अखेर भाजपने जिंकली आणि फलटणच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभेचे दरवाजे खुले झाले. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी प्रतिनिधित्त्व केलेल्या माढा मतदारसंघात भाजप नेत्यांनी केलेली व्यूहरचना यशस्वी होताना राष्ट्रवादी कॉंग्रेसला पराभवाचा धक्का दिला आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांचा गट, माणचे आमदार जयकुमार गोरे यांच्या आणि खुद्द फलटण मतदारसंघात नाईक निंबाळकर यांना मिळालेल्या मतांच्या आघाडीने त्यांना मोठा विजय मिळवून दिला. या निकालाने विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यापुढे आता अडचणींचा सामना करण्याची वेळ येण्याची शक्‍यता आहे.

लोकसभा निवडणूक लढविणार नाही, असे यापूर्वी सांगणाऱ्या शरद पवार यांनी यावेळच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्यावर माढ्यातून निवडणूक लढविणार असल्याचे सांगत एक चाल खेळली होती. नंतर मावळमध्ये पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे आपण लढणार नसल्याचे सांगत माढ्यातून पवारांनी माघार घेतली होती. त्यामुळेच माढ्याची चर्चा राज्यभर रंगली होती. संजयमामा शिंदे यांना आपल्याकडे वळवित पवारांनी उमेदवारीही बहाल केल्यामुळे माढा जिंकण्याचा चंग बांधलेल्या भाजपपुढे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले होते.

राष्ट्रवादी कॉग्रेसचे खासदार विजयसिंह मोहिते यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते भाजपमध्ये आले. मोहिते पाटील की सुभाष देशमुखांचे चिरंजीव अशा गुंत्यात अडकलेल्या भाजपला सातारा जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष असलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा पर्याय मिळाला. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे वडील हिंदूराव नाईक निंबाळकर 1996 मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून विजयी झाले होते. एवढी पार्श्‍वभूमी लाभलेल्या रणजितसिंहांना भाजपची मोठी ताकद मिळाली. माढा मतदारसंघात माढा, करमाळा, सांगोला व माळशिरस या सोलापूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांचा तर माण आणि फलटण हे सातारा जिल्ह्यातील मतदारसंघांचा समावेश आहे.

यापैकी माढा, सांगोला व करमाळा तीन मतदारसंघात राष्ट्रवादी कॉग्रेसला थोडे मताधिक्‍य मिळाले. तरीही माळशिरस, माण व फलटण या तीन मतदारसंघांनी भाजपला दिलेल्या मोठ्या मताधिक्‍क्‍याने निंबाळकरांना विजय मिळवून दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजयमामा शिंदे यांना सोलापूर जिल्ह्यातून होणारा विरोध, मोहिते पाटील तसेच माणमधून जयकुमार गोरे व शेखर गोरे या बंधूंकडून मिळालेली ताकद, भाजपने हरप्रकारे पुरवलेली रसद आणि मुख्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली सभा या सर्व गोष्टी नाईक निंबाळकर यांच्या विजयातील मोठा वाटा ठरल्या. सोलापुरातील चार आणि साताऱ्यातील दोन असे विधानसभा मतदारसंघ असल्यामुळे निंबाळकर दुसऱ्या जिल्ह्यातील आहेत, अशा विचारांना मतदारांनी थारा दिला नाही. त्याशिवाय या मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मिळालेली मतेही परिणामकारकच ठरली. भाजपने प्रतिष्ठेची बनविलेली ही जागा राष्ट्रवादी कॉग्रेसकडून खेचून घेण्यात यश मिळविले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here