होमगार्ड जखमी, नागरिकांमध्ये घबराट
सातारा : शहरालगत असलेल्या शाहूपुरीमधील नागरी वस्तीमध्ये रविवारी रात्री अचानक रानगवे घुसले. शाहूपुरी येथील चौकात असणाऱ्या पोलिसांच्या मागे हा गवा लागल्याने एक होमगार्ड जखमी झाला आहे. गव्यांच्या वावरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण असून रात्री उशिरापर्यंत ड्रोन कॅमेऱ्याद्वारे वन विभागाच्या पथकाकडून त्यांचा शोध सुरू होता.
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडावून असल्याने नागरिक घरीच थांबणे पसंत करीत आहेत आहेत. नागरिक घरातच असल्याने वन्य प्राण्यांचा वावर नागरी वस्त्यांमध्ये होऊ लागला आहे. सातारा- कास, सातारा- महाबळेश्वर रस्तावर नेहमी रानगव्यांचे दर्शन घडते. रविवारी रात्री मात्र रानगव्यांनी चक्क शाहूपुरी येथील नागरी वस्तीमध्ये घुसखोरी केली आहे.
गेंडामाळ नाका बाजूने रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक गवा पळत आला. यावेळी बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांच्या पाठीमागे लागल्याने काही काळ कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी चौकात कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्डने भिंतीवरून उडी टाकल्याने तो जखमी झाला.परिसरातील नागरिकांच्या पाठीमागेही गवा लागला होता. काही नागरिकांनी गव्यास हुसकाऊन लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा गवा आंबेदरे रोडलगतच्या परिसरात घुसला.
या घटनेची माहिती शाहुपुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र मोहिते यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला. घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते. उशिरापर्यंत ड्रोन कॅमेराद्वारे वनविभागाकडून शोध सुरू होता. नागरी वस्तीमध्ये गवे घुसल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.