रानगव्याच्या मृत्यूवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले……

मुंबई – वनक्षेत्रातून वाट चुकून पुण्यातील शहरी वस्तीत आलेल्या रानगव्याचा ( Gaur )मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्याला अतिक्रमण झालेले चालत नाही, तसे वन्यप्राण्यांच्या अधिवासांवरही मानवी अतिक्रमण होऊ नये, त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे याचे भान ठेवावे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांनी दिली आहे.

अजित पवार म्हणाले, वन्य प्राण्यांच्या निवासावर मनुष्याचे अतिक्रमण होत असल्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत येण्याचे प्रकार वाढले आहेत. मध्यंतरी बिबटेही बाहेर येण्याचे प्रकार घडले होते. आता पुण्यात रानगवा आल्याचे आपण पाहिले. मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत असून विकासाच्या नावावर जंगलाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत चालल्याने ते जंगलाबाहेर पडत आहेत. आपल्या पुढच्या पिढीच्या दृष्टीने हे अतिशय धोकादायक आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

काल पुण्यात घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी होता. रानगव्याला उचकवण्याचा प्रयत्न लोकांनी केला त्यामुळे रानगवा सैरभैर पळत होता, गाड्या उलटवण्याचा प्रयत्न करत होता आणि स्वतःचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करत होता. दुर्दैवाने त्या मुक प्राण्याला स्वतःचा जीव गमवावा लागला.

आपल्याला अतिक्रमण झालेले चालत नाही, तसे वन्यप्राण्यांच्या अधिवासांवरही मानवी अतिक्रमण होऊ नये, त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे याचे भान सर्वांनी ठेवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.