पुदुच्चेरी -केंद्रशासित प्रदेश असणाऱ्या पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री म्हणून एआयएनआरसी या पक्षाचे नेते एन.रंगासामी यांनी शुक्रवारी शपथ घेतली. ते चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळत आहेत. दरम्यान, प्रथमच पुदुच्चेरीमधील सरकारचा घटक बनलेल्या भाजपला उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे.
पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीत एआयएनआरसी-भाजप युतीने बाजी मारली. विधानसभेच्या एकूण 30 पैकी 16 जागा त्या युतीने पटकावल्या. आता मुख्यमंत्री वगळता दोन्ही पक्षांच्या वाट्याला तीन-तीन मंत्रिपदे जाणार आहेत. नव्या मंत्र्यांचा शपथविधी लवकरच होणार आहे. भाजपचे नेते ए.नमस्सिवायम यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. त्यामुळे ते उपमुख्यमंत्री बनणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या रूपाने पुदुच्चेरीला प्रथमच उपमुख्यमंत्री मिळणार आहे. पुदुच्चेरी सरकारचा घटक बनल्याने भाजपचे दक्षिणेतील स्थान आणखी भक्कम झाले आहे. दक्षिणेतील कर्नाटक राज्यात भाजप आधीपासूनच सत्तेवर आहे. निवडणुकीआधी पुदुच्चेरीत कॉंग्रेसची सत्ता होती. मात्र, त्या पक्षाला यावेळी केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले. कॉंग्रेसचा मित्रपक्ष द्रमुकला 6 जागा मिळाल्या. तर, उर्वरित 6 जागांवर अपक्ष विजयी झाले.