भारत हा क्रिकेटवेड्यांचा देश समजला जातो. अगदी लहान मुलापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना क्रिकेट या खेळाबद्दलची आवड दिसून येते. त्यामुळे कधी कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी एकत्र भेटले की फावल्या वेळात कधीतरी क्रिकेटचा सामना रंगतो,
हा अनुभव प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी घेतलेला असेलच. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून प्रसिद्ध मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडेचा आहे.
या व्हिडिओतील कॅप्शनमध्ये गौतमीने म्हटले आहे की, आणि जेव्हा मी क्रिकेट खेळते. मी खेळू शकत नाही, पण मला खरंच हे आवडते. डान्स पाहा.’ या कॅप्शनमध्ये तिने हसण्याचेही इमोजी टाकले आहेत. या व्हिडिओमध्ये गौतमी मस्त फटकेबाजी करताना दिसत आहे. त्याचबरोबर लांबवर फटका मारल्यानंतर ती नाचतानाही दिसत आहे.
गौतमी ही क्रिकेटची खूपच चाहती आहे. तिने तिच्या सोशल मीडियाच्या पोस्टवरूनही अनेकदा तिचे क्रिकेटचे प्रेम व्यक्त केले आहे. तसेच ती आयपीएलमधील महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणारी चेन्नई सुपर किंग्स संघाची चाहती आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास गौतमी “माझा होशिल ना’ या मालिकेत सई नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे. या मालिकेत सई आणि आदित्य या दोन व्यक्तींच्या प्रेमाची कहाणी दाखवली आहे. आदित्यची भूमिका विराजस कुलकर्णी साकारत आहे.
गौतमी ही प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची धाकटी बहीण आहे. ती पेशाने इंजिनियर असून तिने अभिनय क्षेत्रात “सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेतून पदार्पण केले होते.