Randeep Hooda : अभिनेता रणदीप हुड्डाने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. बॉलीवूडमध्ये मोठे यश संपादन केल्यानंतर रणदीपने काही महिन्यांपूर्वीच त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. अभिनेता गर्लफ्रेंड लिन लैशरामसोबत लग्नाच्या बेडीत अडकला आहे. 29 नोव्हेंबरला रणदीपने लिनसोबत सात फेरे घेतले. लग्न आणि सर्व विधी मणिपूरमध्ये परंपरेनुसार पार पडले होते.
त्यानंतर अभिनेता ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांच्या बायोपिकमध्ये झळकला होता. हा सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच चर्चेत ठरला होता. तिकीट बारीवर सुद्धा चित्रपटाने चांगली कमाई केली होती. चित्रपट 22 मार्चला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. वीर सावरकरांचा संपूर्ण प्रवास या चित्रपटातून उलगडण्यात आला आहे. मात्र, आता रणदीप बायोपिक चित्रपटांना कंटाळलेला दिसतोय.
नुकतंच ‘इफ्फी 2024’ मध्ये याविषयी बोलताना रणदीप म्हणाला की, आता त्याला मसाला चित्रपटांकडेही वळायचे आहे. जेव्हा रणदीपला विचारण्यात आले की, त्याला आणखी बायोपिक करायला आवडेल का? तर रणदीपने सांगितले की, शेरसिंह राणावर काम अजूनही सुरू आहे. तो शेरसिंग राणा ज्याने पृथ्वीराज चौहान यांचे अवशेष अफगाणिस्तानातून परत आणले. ते एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मी बायोपिकपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे कारण ते खूप थकवणारे आहेत. पण सावरकरांपूर्वी मी ॲक्शन आणि रोमँटिक चित्रपट केले आहेत हे लोक विसरतात. मी सर्व प्रकारचे चित्रपट केले आहेत. मनोरंजक सिनेमाद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला मला आवडेल. असं तो म्हणाला.
रणदीपने स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते. त्यानंतर त्याला दिग्दर्शनाच्या अनेक ऑफर्सही आल्या. याबद्दल बोलताना रणदीप म्हणाला, ‘माझ्याकडे अनेक ऑफर्स आहेत, पण मी त्यात अभिनय केला तरच दिग्दर्शन करेन कारण मला माझ्यापेक्षा चांगला अभिनेता मिळणार नाही. माझ्याकडे दोन-तीन ऑफर आहेत, पण त्या बहुतेक ॲक्शनच्या आहेत.
सावरकरांचा बायोपिक बनवणे आणि रिलीज करणे किती कठीण होते हे रणदीपने सांगितले. तो म्हणाला, हे बनवणे आणि रिलीज करणे खूप आव्हानात्मक होते. बऱ्याच फेस्टिव्हलमध्ये रिलीज न झालेल्या चित्रपटांची आवश्यकता असते आणि आम्हाला आमच्या चित्रपटाचा या स्पर्धेत समावेश करण्याच्या फार कमी संधी होत्या, पण आता आम्ही प्रयत्न करत आहोत.
आम्ही थोड्या फरकाने ऑस्करला मुकलो, पण मला खात्री आहे की याला प्रचंड प्रेक्षक मिळतील. मी शूटिंग करत असलेल्या फेस्टिव्हलमधून मला आमंत्रणे मिळत राहिली आणि मी त्यांना उपस्थित राहू शकलो नाही. रणदीप पुढे म्हणाला मी नेहमीच असा होतो आणि आता मी मसाला चित्रपट बनवण्याच्या मार्गावर आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची प्रत्येक कलाकाराची सर्वात मोठी इच्छा असते आणि हे आमचे नियोजन आहे. असं अभिनेत्यानं यावेळी सांगितलं.