बॅंकॉक – भारताच्या सात्विकसाईराज रान्किरेड्डी याला थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत संमिश्र यश लाभले. त्याने पुरुषांच्या दुहेरीत चिराग शेट्टीच्या साथीत अपराजित्व राखले मात्र, मिश्रदुहेरीत त्याला अश्विनी पोनप्पाच्या साथीत पराभवास सामोरे जावे लागले.
रान्किरेड्डीने शेट्टीच्या साथीत चोई सोल्गेयु व सिओ सियुंग जेई यांचा पराभव केला आणि तिसरी फेरी गाठली. चुरशीने झालेल्या या सामन्यात त्यांनी 21-17, 17-21, 21-19 असा रोमहर्षक विजय मिळविला. या जोडीने दुसऱ्या गेममध्ये सर्व्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवले नाही. त्यामुळे त्यांना ही गेम गमवावी लागली. तथापि तिसऱ्या गेममध्ये पुन्हा त्यांनी खेळावर नियंत्रण मिळविले. त्यांनी स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा बहारदार खेळ केला. निर्णायक क्षणी त्यांनी प्लेसिंगचा कल्पक खेळ करीत विजयश्री खेचून आणली.
रान्किरेड्डी व पोनप्पा यांना मिश्रदुहेरीत युता वातानाबे व अरिसा हेगाशिनो यांनी सरळ दोन गेम्समध्ये पराभूत केले. त्यांनी ड्रॉपशॉट्सचा सुरेख खेळ केला आणि भारतीय जोडीला फारशी संधी दिली नाही.
भारताच्या बी.साईप्रणीतची विजयी घोडदौड दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आली. त्याला सातव्या मानांकित कानता त्सुनेयेमाने 21-18, 21-12 असे हरविले. पहिल्या गेममध्ये त्याने उल्लेखनीय लढत दिली. मात्र नंतर त्याचा बचाव निष्फळ ठरला.