चेन्नई : तामिळनाडूमध्ये सध्या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्यांचे जीवन पूणर्पणे विस्कळीत झाले आहे. कित्येक ठिकाणी झाडे रस्त्यावर उन्मळून पडली आहेत. एनडीआरएफच्या टीमच्या माध्यमातून राज्यात बचाव कार्य सुरु आहे. त्यातच चेन्नईतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चेन्नईतील एक महिला पोलीस इन्स्पेक्टर राजेश्वरी यांनी एक बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या व्यक्तीला आपल्या खांद्यावर उचलून ऑटोपर्यंत नेलं आणि रुग्णालयात पाठवलं. राजेश्वरींच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये, इन्स्पेक्टर राजेश्वरी या रस्त्यावर पडलेली झाडं बाजूला करत आहेत. एका ठिकाणी एक व्यक्ती ही बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे लक्षात आल्यानंतर इन्स्पेक्टर राजेश्वरी यांनी त्या व्यक्तीला थेट आपल्या खांद्यावर उचलून घेतले. त्यानंतर त्या व्यक्तीला घेऊन तशाच ऑटोपर्यंत चालत जातात आणि त्याला ऑटोमध्ये ठेवतात. सोबतच्या लोकांना बेशुद्धावस्थेतील त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करायला सांगतात.
#WATCH | Chennai, Tamil Nadu: TP Chatram Police Station's Inspector Rajeshwari carries an unconscious man, on her shoulders, to an autorickshaw in a bid to rush him to a nearby hospital.
Chennai is facing waterlogging due to incessant rainfall here.
(Video Source: Police staff) pic.twitter.com/zrMInTqH9f
— ANI (@ANI) November 11, 2021
या व्हिडीओमध्ये इन्स्पेक्टर राजेश्वरी यांच्या पायात शूज किंवा चप्पल नाही. तरीही त्या बेशुद्ध व्यक्तीला घेऊन बरंच लांब चालत जातात. त्या अवस्थेतही इन्स्पेक्टर राजेश्वरी या त्यांच्या सहकार्यांना बचाव कार्यासंबंधी काही सूचना करत आहेत.
इन्स्पेक्टर राजेश्वरी या चेन्नईतील चेतराम पोलीस स्टेशनच्या इन्चार्ज आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून इन्स्पेक्टर राजेश्वरी याच खऱ्या सिंघम असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.