पुणे – फर्गसन रस्त्यावर असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन व पत्रकारिता विभाग अर्थात रानडे इन्स्टिट्यूट विद्यापीठात स्थलांतर करून अभ्यासक्रमाचे एकत्रीकरणास माजी विद्यार्थी व विविध संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला होता. त्यामुळे विद्यापीठाने याची गांभीर्याने दखल घेत रानडे इन्स्टिट्यूट विद्यापीठात स्थलांतर करण्यास व त्याचे एकत्रीकरणास स्थगिती दिली आहे.
विद्यापीठाच्या संज्ञापन व पत्रकारिता विभागाची सन 1964 मध्ये पत्रकारितेतील पदविकेच्या स्वरूपात अभ्यासक्रमाने सुरुवात झाली. सन 1976 मध्ये त्यास स्वतंत्र विभाग म्हणून मान्यता मिळाली. रानडे संस्थेच्या इमारतीत हा विभाग चालवला जात असल्याने त्यास रानडे इन्स्टिट्यूट म्हणून ओळखले जाते. ही इमारत व आवार विद्यापीठाने पोटभाडे कराराने घेतलेली असून त्याची मालकी विद्यापीठाकडे नाही. भाडेकराराची बाब सध्या न्यायप्रविष्ट आहे.
विद्यापीठाच्या सन 2011 मध्ये झालेल्या नॅक मूल्यांकनाच्या अहवालात विद्यापीठाच्या विभागांना स्कूल सिस्टिम अर्थात प्रशाला पद्धती लागू करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशांची पूर्तता न झाल्यामुळे सन 2017 मध्ये झालेल्या नॅक पुनर्मूल्यांकनातही पुन्हा निर्देश दिले होते. त्या अनुषगांने चारही विद्या शाखेतील संबंधित विभागांना एका प्रशालेखाली आणून अशा 18 प्रशालांद्वारे पद्धतीची स्थापन करण्यात आली. याच योजनेअंतर्गत संज्ञापन व पत्रकारिता व माध्यम व संज्ञापन अभ्यास विभाग या दोन्ही विभागांचे विषय साधर्म्यांमुळे व विद्यार्थ्यांच्या करियर क्षेत्रातील साधर्म्यामुळे एकत्रीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता.
पत्रकारिता विभागास उपलब्ध असलेली जागा मर्यादित असल्याने व न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे बांधकाम व दुरुस्तीत मर्यादा येत असल्याने भौतिक सोयी-सुविधांचा प्रश्न वारंवार विद्यापीठ अधिकार मंडळापुढे मांडण्यात आला होता. पदवीच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहासाठी विद्यापीठातून ये-जा करावी लागत असल्याने त्यांच्या गैरसोयीचा व अतिरिक्त खर्चाचा प्रश्न विद्यापीठाच्या विचाराधीन होता. त्यामुळे विद्यापीठाने रानडे इन्स्टिट्यूटचा स्थलांतर व एकत्रीकरणाचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र याला माजी विद्यार्थी, संघटनांनी विरोध दर्शविला.