मुंबई – येस बॅंकेचे संस्थापक राणा कपुर यांचा जामीन अर्ज येथील पीएमएलए कोर्टाने फेटाळून लावला आहे. या बॅंकेतील कोट्यवधी रूपयाच्या घोटाळ्याबद्दल ईडीने त्यांना अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे, त्यामुळे आपल्या आशिलाला आता जेलमध्ये ठेवण्याचे कारण नाही त्यामुळे त्यांची जामीनावर सुटका करावी अशी विनंती त्यांच्या वकिलांनी कोर्टात केली होती.
या प्रकरणातील जे पुरावे तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहेत ते सगळे कागदोपत्री पुरावे आहेत त्यात राणा कपुर हे काही छेडछाड करण्याची शक्यता नाही त्यामुळे त्यांना जामीन मंजुर करावा अशी विनंतीही त्यांनी केली होती.
तथापी कोर्टाने त्यांचा हा युक्तिवाद फेटाळून त्यांचा जामीन अमान्य केला. कपुर आणि त्यांच्या कुटुंबियांवर 600 कोटी रूपयांच्या मनि लॉड्रिंगचा आरोप आहे.