रेल्वे अधिकाऱ्यांना अडचण समजताच पुण्याहून औषधे पोहोचली बेळगावात
पुणे – सध्या लॉकडाऊनमुळे राज्य आणि जिल्ह्यांतर्गत सीमा वाहतुकीसाठी बंद ठेवल्या आहेत. यामुळे पोलिसांची परवानगी असल्याशिवाय आणि अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांशिवाय कोणीही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करू शकत नाही. यामध्ये बेळगावच्या एका दाम्पत्याला याचा फटका बसला. लॉकडाऊनमुळे ते मुलाच्या उपचारासाठी आणि औषधांसाठी पुण्यात येऊ शकले नाहीत. ही गोष्ट त्या दाम्पत्याकडून पुणे आणि बेळगाव रेल्वे अधिकाऱ्यांना समजली आणि त्यानंतर मात्र संबंधित मुलाची औषधे रेल्वेने थेट त्यांच्या घरी पोहोचली.
बेळगावमधील टिळकवाडी येथील एका दाम्पत्याच्या 4 वर्षांच्या मुलाचा उपचार पुण्यातील एका डॉक्टरांकडे सुरू आहे. दरमहिन्याला ते दाम्पत्य उपचार आणि औषधांसाठी पुण्यात ये-जा करतात. मात्र, लॉकडाऊनमुळे ते बेळगाव ते पुणे हा प्रवास करू शकले नाहीत.
संबंधित दाम्पत्यानी बेळगावच्या रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पुण्यातून बेळगावपर्यंत औषधे पोहोचवण्याची विनंती केली. अधिकाऱ्यांनीदेखील तातडीने पुणे विभागातील अधिकाऱ्यांशी शनिवारी (11 एप्रिल) रोजी याबाबत संपर्क साधला असता, अधिकाऱ्यांनी मदत करण्याची ग्वाही दिली आणि औषधे पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.
त्यानंतर दाम्पत्याच्या पुण्यातील नातेवाईकांनी डॉक्टरांकडून औषधे घेऊन रेल्वेच्या पुणे स्थानकातील अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. तर परिचालन प्रबंधक मयंक राणा आणि वाणिज्य प्रबंधक अजयकुमार यांनी पुढील कार्यवाही करत ही औषधे पुण्याहून बेळगावला जाणाऱ्या मालगाडीतील गार्डकडे दिली.
पुणे, मिरजमार्गे बेळगावला जाणाऱ्या या गाडीचे गार्ड तीनवेळा बदलण्यात येतात. या गाडीतील नियुक्त गार्डनेही जबाबदारीने ही औषधे एकमेकांकडे हस्तांतरित केली. असा प्रवास करत ही औषधे दुसऱ्या दिवशी रविवारी सुरक्षितपणे बेळगावमध्ये पोहोचली. या संपूर्ण प्रवासात मयंक राणा आणि अजयकुमार हे दोन्ही अधिकारी सातत्याने तिन्ही गार्डच्या संपर्कात होते. ही औषधे पोहोचूनदेखील देशव्यापी लॉकडाऊनमुळे त्या मुलाचे वडील टिळकवाडीहून बेळगाव स्थानकापर्यंत पोहोचू शकले नाहीत.
ही परिस्थिती लक्षात घेता, बेळगावच्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी ही औषधे पोहोचवली.
औषधे मिळाल्याने वडीलांच्या डोळ्यांत अश्रु तरळले. दरम्यान, त्यांनी पुणे आणि बेळगावच्या रेल्वे संवेदनशील रेल्वे अधिकाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.