विविधा: रामशास्त्री

माधव विद्वांस

ज्यांच्यामुळे “रामशास्त्री बाण्याचे न्यायाधीश’ ही बिरुदावली रूढ झाली त्या प्रामाणिक, निर्भीड आणि प्रसिद्ध न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांचे आज पुण्यस्मरण (निधन 15 ऑक्‍टोबर 1789). रामशास्त्री प्रभुणे यांचा जन्म साताऱ्याजवळील माहुली येथे 1720 मध्ये झाला. ते लहान असतानाच त्यांचे वडील विश्‍वनाथ व आई पार्वतीबाई यांचे निधन झाले. तेव्हा काकाने त्यांचा काही काळ सांभाळ केला. पण मोठा होऊनही काही द्रव्यार्जन करीत नाही, हे पाहून काकाने त्यांस घराबाहेर काढले. तेव्हा सातारचे सावकार अनगळ यांचे घरी ते शागीर्द म्हणून काम करू लागले. नंतर अनगळ यांच्या प्रोत्साहनाने प्रौढपणी काशीस जाऊन त्यांनी धर्मशास्त्रादी विद्यांचा अभ्यास केला आणि शास्त्री ही पदवी मिळवली. 1751मध्ये नानासाहेब पेशवे असताना पेशवे दरबारात एक शास्त्री म्हणून प्रथम नोकरीस लागले. पेशवे दरबाराचे न्यायाधीश बाळकृष्णशास्त्री यांचे निधन झाल्यावर त्यांची न्यायाधीशाच्या जागी वर्ष 1759मध्ये नेमणूक झाली.

थोरले माधवराव जेव्हा पेशवे झाले तेव्हा रामशास्त्री सरन्यायाधीश होते. थोरले माधवराव पेशवे रामशास्त्री यांच्याबरोबर हरेक विषयांत सल्लामसलत करीत असत.खुद्द माधवराव पेशवे प्रत्येक महत्त्वाचा प्रश्‍न, युद्धसंग्राम, जयापजय, नफानुकसान, खासगी किंवा सार्वजनिक कोणतीही बाब इत्यादींबाबत रामशास्त्री यांचा सल्ला घेत असत.

नारायणराव पेशवे ह्यांचे खुनास त्यांनी चुलते रघुनाथराव (राघोबा) हेच जबाबदार आहेत, असे गृहीत धरून त्याबद्दल त्याचे देहान्त प्रायश्‍चितच घेतले पाहिजे, असे त्यांनी उद्‌गार काढले आणि लगेच न्यायाधीशपदाचा राजीनामा देऊन ते वाईजवळ पांडेवाडी येथे जाऊन राहिले. पुढे बारभाई कारस्थानात नाना फडणवीस, सखारामबापू वगैरे कारभाऱ्यांनी रघुनाथरावांना पदभ्रष्ट केले. त्यानंतर 1777 मध्ये कारभाऱ्यांनी रामशास्त्रींची पेशवे सरकारात पुन्हा न्यायाधीश पदावर नेमणूक केली. शनिवारवाड्यात रामशास्त्री न्यायनिवाडे व विद्वानांच्या परीक्षा करीत. त्यांनी अग्निहोत्र घेतले होते. निर्भीड व निःस्पृह न्यायाधीश म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती झाली. तसेच त्यांच्या कडक परीक्षा पद्धतीमुळे ते विख्यातही झाले व अप्रियही झाले.

रामशास्त्रींच्या खासगी जीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. पेशवे दफ्तरातील नोंदीप्रमाणे त्यांना पालखीचा मान होता तसेच इ. स. 1780 साली त्यांना रु.2,000 वार्षिक तनखा, रु.1,000 पालखीसाठी पेशवे दरबारातून मिळत होते. याशिवाय पेशवे सरकारने त्यांची कर्जे फेडली, पत्नीच्या उत्तरक्रियेचा खर्च केला आणि दुसऱ्या लग्नासाठी पैसे दिले. तथापि एकूण चाळीस वर्षांच्या त्यांच्या सेवेबद्दल पेशव्यांकडून त्यांना एकूण 55,968 रुपयेच मिळाल्याचे दिसते.

त्यांनी पहिला विवाह 1758 साली केला. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी 1778 मध्ये काशीबाईंशी लग्न केले. त्यांच्यापासून त्यांना एक मुलगा व एक मुलगी झाली. त्यांचे निधन पुण्यात झाले. त्यांचे पश्‍चात मुलगा गोपाळशास्त्री यांस प्रथम पेशवे दरबाराकडून व पुढे इंग्रज सरकारकडून तनखा होता.

Leave A Reply

Your email address will not be published.