राष्ट्रीय जल आयोगाची मान्यता न घेण्याचे पाप रामराजेंचे

प्रा. एस. वाय. पवार; खंडाळ्याचे हक्काचे पाणी पळविण्याचा डाव उधळण्याचा इशारा

शिरवळ – खंडाळा तालुक्‍यातील जनतेला धोम- बलकवडी प्रकल्पाचा भुलभुलैया दाखवून बेगडी प्रेम जपणारे परंतु निरा- देवघरसारख्या वरदान ठरणाऱ्या प्रकल्पाला राष्ट्रीय जलआयोगाची मान्यता न घेण्याचे पाप विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनीच केले आहे. खंडाळा तालुक्‍यातील जनता आता सुज्ञ व जागृत झाली असुन तालुक्‍याच्या हक्काचे पाणी पळविण्याचा डाव उधळून लावला जाईल, असा इशारा पाणी पंचायतीचे उपाध्यक्ष व खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती प्रा. एस. वाय. पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

खंडाळा तालुक्‍यात झालेल्या कार्यक्रमात रामराजे नाईक निंबाळकर यांनी निरा- देवघर प्रकल्प व गावडेवाडी उपसा सिंचन योजनेबाबत जाहीर भाष्य केले होते. त्यांच्या या भूमिकेबाबत खंडाळा तालुका पाणी पंचायतीच्या वतीने नाराजी व्यक्त करीत निषेध करण्यात आला. याबाबत प्रा. पवार म्हणाले, “”खंडाळा तालुक्‍याने अनेक वर्ष दुष्काळाचे चटके सहन केले आहेत. केवळ पाणी आणल्याचा भुलभुलैया करण्यात आला आहे.

तालुक्‍याला हक्काच्या पाण्यापासुन तत्कालीन लोकप्रतिनिधी असलेल्या रामराजेंनी जाणूनबुजून लांब ठेवले आहे. केवळ खुर्ची टिकविण्यासाठीच हा प्रकार झाला आहे. सत्य परिस्थिती समोर आल्याने ज्या जनतेने तत्कालीन लोकप्रतिनिधींना देवघरात जागा दिली होती तेच लोक आता त्यांच्या विषयी गरळ ओकू लागले आहेत. तरीसुद्धा नाईक निंबाळकर यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे ही गोष्ट तालुक्‍यासाठी अतिशय शरमेची आहे.”

वास्तविक तालुक्‍यासाठी वरदान ठरणाऱ्या नीरा देवघर प्रकल्पाला 1984 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यानंतर धरणाचे काम 1992 मध्ये सुरू होऊन 1999-2000 मध्ये पूर्ण झाले. 2000 मध्ये देवघर धरणात पाणी अडवून साठले आहे. त्याला 19 वर्षे पूर्ण झाली.

या कालावधीमध्ये रामराजे नाईक निंबाळकर मंत्रिमंडळात राहिले आहेत. त्यापैकी दहा वर्षे कृष्णा खोऱ्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले, असे सांगून ते म्हणाले, “”19 वर्षे खंडाळा व फलटण तालुक्‍याच्या शेतीला नीरा देवघरच्या पाण्यापासून वंचित ठेऊन इमानेइतबारे हे पाणी बारामती, इंदापूर, माळशिरस, फलटण या भागाला पोहोच केले. आता बारामती, इंदापूर या तालुक्‍यांचे पाणी बंद झाल्यानंतर रामराजेंना आता गावडेवाडीतून खंडाळा व फलटण तालुक्‍याच्या शेतीला लवकर पाणी मिळेल, असा साक्षात्कार झाला आहे का?” खंडाळा तालुक्‍याने 35 वर्षांपूर्वी आपल्या हक्काचे पाणी मिळवले.

परंतु, तुमच्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमधील 19 वर्षे तुम्ही खंडाळा तालुक्‍याला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम केले आणि तुमचे हे पाप उघड झाले असून आज गावडेवाडीतून खंडाळा तालुक्‍याच्या शेतीला लवकर पाणी देण्याची भाषा तुम्ही बोलू लागला आहात, यामध्ये खंडाळा तालुक्‍याच्या हक्काचे पाणी फलटणला पळविण्याचा तुमचा डाव खंडाळा तालुक्‍यातील जनतेने ओळखला आहे. यापुढे तालुक्‍यातील जनतेची दिशाभूल तुम्ही करू नका, असा इशारा यावेळी देण्यात आला. खंडाळा तालुक्‍यावर होणारा अन्याय आता तरी थांबवा अन्यथा नियती तुम्हाला कधीच माफ करणार नाही, असा सल्लाही त्यांनी दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.