रामराजेंचा निर्णय येत्या आठ दिवसांत

फलटणच्या मेळाव्यात फक्त मार्गदर्शन; दुष्काळी तालुक्‍यातील सर्वसामान्य लोकांसाठी काम करणार

फलटण – “जिल्ह्याच्या भवितव्यासाठी यापुढे निर्णय घेणार असून जिल्ह्यात अनेक पक्षांत उड्या घेणाऱ्यांमुळे वाईट संस्कृती फोफावली आहे. ती नेस्तनाबूत करणे तसेच दुष्काळी तालुक्‍यातील सर्वसामान्य लोकांसाठी भविष्यात योग्य असा राजकीय निर्णय घेत फलटण, खंडाळा, माण व खटाव या दुष्काळी तालुक्‍यांसाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

येत्या आठ दिवसांत राजकीय निर्णय घेणार असल्याचे सांगत त्यांनी “वेट अँड वॉच’चीच भूमिका घेतली. फलटण येथील कार्यकत्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. जिल्ह्यासह महाराष्ट्रात काही दिवसांपासून भाजपमध्ये मेगा भरती सुरु आहे. शिवसेनेतही अनेक कॉग्रेस राष्ट्रवादीचे बडे नेते दाखल होत असताना शिवेंद्रराजे भोसले भाजपात दाखल झाले. खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. याचपाठोपाठ रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी कॉग्रेस सोडण्याच्या तयारीत होते. पुढील राजकीय निर्णय घेण्यासाठी त्यांनी शुक्रवारी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला होता. यामध्ये ते शिवसेनेत जातील, असा कयास अनेकांनी बांधला होता. मात्र, यावेळी रामराजे म्हणाले, “”माझ्या राजकीय वाटचालीमध्ये शरद पवार यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांनी जिल्ह्यातील अनेक विकास कामांसाठी भरभरुन निधी दिला.

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आंध्र व कर्नाटकला जाणारे तब्बल 81 टीएमसी पाणी अडविण्यात मला यश आले. याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प सुरु असताना केवळ धोम बलकवडीचा प्रकल्प 100 टक्के पूर्ण करण्यामध्ये मला यश आले. यापुढे माण, खटाव, फलटण, खंडाळा व उत्तर कोरेगाव या साडेचार तालुक्‍यांच्या विकासासाठी पुढील चार वर्षे सत्तेच्या माध्यमातून काम करावे लागणार असल्याने येणाऱ्या आठ दिवसांमध्ये पुढील राजकीय निर्णय घेणार आहे.” यावेळी त्यांनी चौफेर टीका करीत जिल्ह्यातील राजकीय घडामोडींचा आढावा मांडताना उलटसलुट कोणीही पक्षात उड्या घेऊन पक्ष खराब करीत असल्याची टीका रामराजे यांनी केली.

माझ्या राजकीय जीवनामध्ये खरे हिरो शरद पवार होते व मी राजकारण शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच केले. यामुळे मला शरद पवारांना दुखावून चालणार नाही. मात्र, तरुण पिढीसाठी सत्तेवाचून कार्यकर्ता टिकणार नाही, यामुळे निर्णय घ्यावाच लागणार आहे, असे स्पष्ट करून रामराजे म्हणाले, “”कधी कधी दुष्काळी भागातील तालुक्‍यांची आघाडी करुन विधानसभेच्या निवडणुका लढवाव्या वाटतात. मात्र 1991 मध्ये माझे पहिले भाषण झाले. तेव्हा गोंधळलेल्या पिढीचा मी गोंधळलेला नेता होतो.

आजही 2019 लाही असेच वाटते आहे. यामुळे एक तर तरुण पिढीकडे जावे लागेल, नाही तर त्यांना आपल्याकडे आणावे लागेल.” आपल्या तालुक्‍यात कोण आपल्याबरोबर घ्यायचे आणि कोणाला नाही हे नंतर बघू, असे वक्तव्य त्यांनी केल्यामुळे एकप्रकारे राष्ट्रवादीच्या युवा गटाला लक्ष केल्याने रामराजे नाईक निंबाळकर लवकरच राष्ट्रवादी सोडून नक्की कोणत्या पक्षात जाणार, याबाबत अजून पत्ते ओपन केले नसल्याने जिल्ह्यात चर्चा बाकीच राहिली आहे. मी कुठल्या पक्षात जाणार आहे, ते मला माहित नसत मात्र पत्रकारांना टेलीपथी कळते. पण मोदींच्या मनात काय आहे हे आधी आम्हाला सांगा, असा टोला लगावत त्यांनी शरद पवार यांच्या मनातलं कोणालाच कळत नाही, असे सांगत त्यांनी पक्ष नक्की कोणता, याचे उत्तर गुलदस्त्यातच ठेवले.

चार आमदार निवडून आणू शकतात

श्रीमंत रामराजे हे कोणत्याही पक्षात गेले तरी चार आमदार निवडून आणू शकतात, असे मत पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कराडकर यांनी व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ नेते बंटीराजे खर्डेकर, आमदार दीपक चव्हाण, बकाजीराव पाटील, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, सुभद्राराजे नाईक निंबाळकर, विश्‍वजीतराजे नाईक निंबाळकर, शिवरुपराजे खर्डेकर, रमेश धायगुडे, अँड. नितीन भोसले, डी. के. पवार, महादेव पवार यांच्यासह फलटण, खंडाळा, कोरेगाव येथील कार्यकर्ते उपस्थित होते. 

Leave A Reply

Your email address will not be published.