रामराजेंनी लवासा, पवारांच्या संस्थांना जमिनी दिल्या

आमदार जयकुमार गोरेंचा गौप्यस्फोट : मिरजेच्या रूग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला

खोट्या माहितीव्दारे मुंबईत फ्लॅट

रामराजे नाईक निंबाळकर यांनी दारिद्य्र रेषेखालील उत्पन्न दाखवून मुंबईत फ्लॅट घेतला आहे. यासह अनेक विषय अजून बाहेर येणार आहेत. रामराजेंना लवकरच पदाचा राजीनामा द्यावा लागेल, असा इशारा गोरे यांनी यावेळी दिला. तसेच फलटण मतदारसंघात हस्तक्षेप न करण्याचे ते सांगत आहेत. मात्र, त्यांचा हस्तक्षेप संपूर्ण जिल्ह्यात चालतो. मग माझा फलटणमध्ये का चालत नाही, असा सवाल करून गोरे म्हणाले, “”आता फलटणचे लोकच ठरवतील काय करायचे ते. कोणत्याही गोष्टीसाठी एक काळ यावा लागतो, तो आता आला आहे. या जगात चिरकाल कोणाची सत्ता राहिलेली नाही. रामराजेंच्या पापाचा घडा भरला असून त्यांना आता मिरजच्या रूग्णालयात उपचार घ्यावे लागणार आहेत.”

सातारा  – रामराजेंनी बारामतीकरांची चापलुसी करून मंत्रिपदासह विधान परिषदेचे सभापतीपद प्राप्त केले. कृष्णा खोरे महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात रामराजेंनी पवारांच्या संस्थांना तसेच लवासा प्रकल्पाला 13 हेक्‍टर जमीन दिली, असा गौप्यस्फोट आमदार जयकुमार गोरे यांनी केला. दरम्यान, रामराजेंकडून खालच्या पातळीवर होत असलेली टीका पाहता त्यांचे मानसिक संतुलन ढासळले असून त्यांच्यावर मिरजेच्या रूग्णालयात उपचार करण्याची गरज आहे, असा टोलाही गोरे यांनी लगावला. साताऱ्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गोरे म्हणाले, “”नीरा-देवघरचे पाणी खंडाळा, फलटणला देण्याचा निर्णय झाल्यानंतर रामराजेंना आनंद व्हायला हवा होता, त्यांनी या निर्णयाचे स्वागत करायला हवे होते. मात्र, तसे न करता उलट फलटणचे पाणी सांगोल्याला देणार असल्याची चुकीची माहिती ते पसरवत आहेत. वास्तविक रामराजे सध्या वैफल्यग्रस्त झाले आहेत. कायम बारामतीकरांची चापलुसी करून पदे मिळविली. एवढेच नव्हे तर कृष्णा खोरे महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत पवारांच्या संस्थांसह लवासा सिटीला जमिनी देण्याचा निर्णय घेतला. रामराजेंच्या अध्यक्षतेखाली 13 एप्रिल 2005 रोजी झालेल्या बैठकीत वसणगाव धरण परिसरातील 12.68 हेक्‍टर जमीन लवासा सिटीला देण्याचा निर्णय झाला.

त्याचबरोबर नीरा डावा कालवानजिक प्रत्येकी 13.18 व 1.45 हेक्‍टर जमीन विद्या प्रतिष्ठान, बारामती संस्थेला देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नीरा डावा कालवा नजिक 2.10 हेक्‍टर जमीन अनंत स्मृती प्रतिष्ठान व संशोधन केंद्र, बारामती यासह मुठा डावा कालवा लगतची शेतकी महाविद्यालय, शिवाजीनगर पुणे येथील 1 हेक्‍टर जागा अनंत स्मृती प्रतिष्ठान व संशोधन केंद्राला देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे जळोची (ता. बारामती) येथील नीरा डावा कालवा नजिकची तीन एकर जागा शरदचंद्रजी स्काऊट ऍण्ड ट्रेनिंग सेंटर या संस्थेला देण्याचा निर्णय घेण्यात आला. वास्तविक कृष्णा खोरेच्या एवढ्या जमिनी पवारांच्या संस्थाना देताना रामराजेंना इतर एकही संस्था कशी दिसली नाही, असा सवाल उपस्थित करून गोरे म्हणाले, “”एवढ्या उत्तम पध्दतीने रामराजेंनी बारामतीकरांची चापलुसी केल्यामुळे पदे प्राप्त केली. या सगळ्या प्रकरणांची मागेच चौकशी लागली असती. परंतु अल्पमतातील सरकार आणि विधानपरिषदेच्या सभापतीपदाच्या जोरावर चौकशा थांबविल्या गेल्या.”

“”रामराजेंनी माझ्यावर पनवेलच्या जागेचा आरोप करण्यापेक्षा चौकशी लावावी. त्यांना कोणी अडविले आहे. त्याचबरोबर आणखी गुन्हे दाखल करण्यासाठी महिला शोधा. खरे तर माणसाचे वय झाले की मेंदू काम करायचा बंद करतो. माढा लोकसभा मतदारसंघात झालेला पराभव त्यांना सोसवत नाही. दोन्ही निवडणुकीत राष्ट्रवादीचे फलटणमधील मताधिक्‍य घटले आहे. त्यामुळे सन्मानाने त्यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे. उगाच आम्हाला कुत्र्याच्या उपमा देवू नका. या वयात कुत्री चावली तर जी इंजेक्‍शन घ्यावी लागतात ती तुम्हाला सोसणार नाहीत,” असा टोला गोरे यांनी लगावला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here