Ramraje Nimbalkar । राज्यतील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात जाणार असल्याच्या चर्चा चालू होत्या. याच चर्चांवर रामराजे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. यापुढे महायुतीबरोबर काम करण्याची आपली इच्छा नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
मागील काही दिवसांपासून रामराजे नाईक निंबाळकर हे महायुतीमध्ये नाराज असल्याचे म्हटले जात होते. मध्यंतरी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्येदेखील आपली नाराजी पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्याकडे मांडणार असल्याचे सांगितले होते. विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून या सर्व नाराजीस सुरुवात झाल्यानंतर त्यांच्या नाराजीच्याही चर्चा सुरू झाल्या. त्यात इंदापूरमध्ये शरद पवारांनी केलेल्या विधानामुळे त्यात भरच पडली.
रामराजे नाईक निंबाळकरांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या आगामी राजकीय वाटचालीबाबत सूचक विधान करतानाच महायुतीचं काम इथून पुढे करणार नसल्याचं स्पष्ट केलं. “आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. हे कार्यकर्ते माझा शब्द शेवटचा मानून गेल्या ३० वर्षांपासून काम करत होते. प्रत्येकाला पटत होतं अशातला भाग नाही. फक्त मी सांगत होतो म्हणून ते करत होते. पण आज त्यांनी मला सांगितलं आहे की आम्ही आता महायुतीबरोबर नाही. माझा सगळ्यात धाकटा भाऊ संजीव राजेनंही मला हे सांगितलंय. त्यामुळे माझ्यासाठी आता यापुढे महायुतीसाठी काम करणं अशक्य आहे”, असं रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले आहेत.
पण मी युतीबरोबर काम करणार नाही Ramraje Nimbalkar ।
“मी अजित पवारांना सोडणार की नाही हा वेगळा विषय आहे. मी शरद पवारांबरोबर जाणार की नाही हाही वेगळा विषय आहे. पण मी युतीबरोबर काम करणार नाही. महायुतीबरोबर राहण्याची आमची वा आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा नाही. ज्या पद्धतीने दोन-अडीच वर्षं या सरकारने आमच्या सबंध जिल्ह्यात प्रशासन व दोन ते तीन लोकांना हाताशी धरून ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसांना छळलं आहे, त्याविरुद्ध ही प्रतिक्रिया आहे एवढंच मी सांगेन”, अशा शब्दांत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्याच सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे.
रामराजेंविषयी शरद पवारांचे सूचक विधान Ramraje Nimbalkar ।
काही दिवसांपूर्वी इंदापूरमध्ये जाहीर कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांनी महायुती व भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. यावेळी शरद पवारांनी इथून पुढे १४ ऑक्टोबरला फलटणमध्येही असाच जाहीर कार्यक्रम असल्याचं आमंत्रण आल्याचा उल्लेख केला. त्यानंतर महाराष्ट्रभरात पुढच्या महिन्याभरात असे कार्यक्रम होतील, असेही सूतोवाच त्यांनी केले. त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर फलटणमधील कार्यक्रमात शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना बळ मिळू लागलं आहे.