रामराजेंनी राखला फलटणचा बालेकिल्ला “अभेद्य’

आ. दीपक चव्हाण यांची “हॅट्ट्रिक’; विरोधकांच्या भ्रमाचा भोपळा फुटला
अजय माळवे
फलटण – विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण मतदारसंघचा आपला गड अभेद्य ठेवत दीपक चव्हाण यांना आमदरकीची “हॅट्ट्रिक’ मिळवून दिली आहे. लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात धक्‍कादायक निकाल लागल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही फलटण मतदारसंघावर आपण सहज कब्जा मिळवू, अशा भ्रमात भाजप आणि रामराजेंचे विरोधक होते. मात्र, रामराजेंनी आ. चव्हाणांना एकहाती निवडून आणत विरोधकांच्या भ्रमाचा भोपळा फोडला आहे.

फलटण विधानसभा मतदारसंघावर गेल्या 25 वर्षापासून अधिक काळ रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाचे एकतर्फी वर्चस्व आहे. 1995 ते 2009 पर्यंत स्वतः रामराजे या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून जात होते. 2009 साली मतदारसंघांच्या पुनर्रचनेत फलटण विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्याने त्यांनी दीपक चव्हाण यांना संधी देत निवडून आणले. 2014 मध्ये मोदी लाटेतही आ. चव्हाण यांना पुन्हा एकदा सहज निवडून आणून राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला अभेद्य राखला होता. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजताच फलटणमध्ये अत्यंत चुरशीची निवडणूक होईल, असे चित्र विरोधकांनी रंगवले होते. कारण त्या आधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत रामराजे यांचे कट्टर विरोधक हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव रणजितसिंह हे भाजपच्या तिकिटावर माढ्याचे खासदार झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत फलटण मतदारसंघावरील रामराजेंचे वर्चस्व मोडून काढू, असे त्यांना वाटू लागले. ते मतदारसंघात परिवर्तन करणार, अशी चर्चाही रंगवण्यात आली. मात्र, रामराजे यांनी दीपक चव्हाण यांना तिसऱ्यांदा राष्ट्रवादीचे तिकिट दिले. विरोधी गटाने अगदी शेवटच्या क्षणी दिगंबर आगवणे यांची उमेदवारी भाजपकडून जाहीर केली.

महाबळेश्‍वरच्या नगराध्यक्ष व फलटण तालुक्‍याच्या माहेरवाशीण स्वप्नाली शिंदे यांनी आधी भाजपकडे उमेदवारी मागितली होती. त्यांनी त्या दृष्टीने तयारीही केली होती. रिपाइंकडून दीपक निकाळजे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. या सर्व नाट्यमय घडामोडीत खा. रणजितसिंह यांनी आगवणे यांचे नाव भाजप व मित्रपक्षांतर्फे शेवटच्या क्षणी निश्‍चित केले. त्यामुळे आ. चव्हाण व आगवणे या पारंपरिक प्रतिस्पर्धांमध्ये पुन्हा लढत झाली. लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फलटण विधानसभा मतदारसंघातून मताधिक्‍य मिळाले होते. विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून रामराजे यांनी तरुण वर्गाला हाताशी धरून प्रचाराची सूत्रे स्वतःच्या हातात घेतली. त्यांनी आपले संपूर्ण घराणे प्रचारासाठी बाहेर काढून प्रत्येक गाव पिंजून काढले.

वाड्यावस्त्यांपर्यंत संपर्क यंत्रणा राबवून आपले राजकीय कौशल्य आणि अनुभव पणाला लावला. युवकांना विश्‍वासात घेत, गेल्या 25 वर्षांच्या काळात सोडविलेला पाणी व रोजगाराचा प्रश्‍न त्यांनी प्रचारात मुख्य मुद्दा केला. दुसरीकडे भाजपच्या तिकिटाची लॉटरी लागूनही आगवणे यांना महायुतीतील घटक पक्ष व भाजपमधील अंतर्गत विरोधकांशी जुळवून घेता आले नाही. निवडणुकीसाठी लागणारे आर्थिक पाठबळही त्यांना फारसे उभे करता आले नाही.

प्रचारात स्थानिक नेते व कार्यकर्त्यांमध्ये एकजूट दिसली नाही, या गोष्टींचा परिणाम आगवणे यांच्या प्रचार यंत्रणेवर झाला. त्यांचे कार्यकर्ते अनेक भागांमध्ये पोहोचलेदेखील नाहीत. त्यामुळे ही लढत आ. चव्हाण यांनी सहज जिंकली. जनतेनेही सत्तेचा समतोल राखत दोघांनाही कामे करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे दोन्ही गटांना यापुढे विकासालाच प्राधान्य द्यावे लागणार आहे.
वंचित आघाडी, अपक्ष उमेदवार प्रभावहीन
या निवडणुकीत दोन्ही बाजूंकडून पाणी, रोजगार, वाढती गुंडगिरी, बंद पडलेला साखरवाडीचा साखर कारखाना, हे प्रचाराचे प्रमुख मुद्दे करण्यात आले. त्यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. या मुद्द्यांवरून रान पेटवले जात असताना, दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी व अपक्ष उमेदवार काहीच प्रभाव पाडू शकले नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.