रॅम्पचे काम बिनबोभाट मंजूर

पालिकेला 2 कोटींचा भुर्दंड; अर्थपूर्ण लागेबांधे उघड


एकच निविदा तरीही 16 कोटींच्या कामाला मंजुरी

पिंपरी – चिंचवड येथील एम्पायर इस्टेटसमोरील उड्डाणपुलाला चिंचवडच्या बाजूने चढण्या-उतरण्यासाठी महापालिकेतर्फे रॅम्प बांधण्यात येणार आहे. तब्बल 14 कोटींच्या या कामासाठी केवळ एकाच ठेकेदाराने निविदा सादर करूनही महापालिकेने निकोप स्पर्धेसाठी फेरनिविदा मागविण्याची तसदी घेतली नाही. तर दुसरीकडे याचा जाब स्थायी समितीच्या बैठकीतही विचारण्यात आला नाही. त्यामुळे महापालिका पदाधिकारी, अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील अर्थपूर्ण लागेबांधे पुन्हा एकदा उघड झाले आहेत. मूळ निविदेतील 14 कोटींच्या कामाचा खर्च आता 16 कोटींपर्यत पोहोचला असून ठेकेदाराला 2 कोटी अधिकचे मोजावे लागणार आहेत.

स्थायी समितीची सभा बुधवारी पार पडली अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. या विषयाच्या मंजुरीबाबत बोलताना मडिगेरी म्हणाले, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी निविदेतील दरांचे तीन वेळा पृथक्करण केले आहे. पिंपरी – चिंचवड महापालिकेतर्फे चिंचवड येथील एम्पायर इस्टेटलगत उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या पुलाला चिंचवडच्या बाजूने चढण्या-उतरण्यासाठी रॅम्प बांधण्याचे महापालिकेचे प्रयोजन आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य बीआरटीएस विभागातर्फे निविदा मागविण्यात आल्या होत्या. या कामासाठी 13 कोटी 99 लाख 57 हजार 668 रुपयांची “निविदा’ प्रसिद्ध करण्यात आली. निविदा सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत केवळ मेसर्स व्ही. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्‍चर यांचीच निविदा सादर झाली होती. त्यांनी या कामासाठी 15 कोटी 80 लाख 55 हजार 546 रुपयांची निविदा सादर केली होती.

त्यांच्या व्यतिरिक्त कुणाचीही निविदा प्राप्त न झाल्यामुळे 15 मे, 21 जून आणि 28 जून रोजी दिलेल्या पत्राद्वारे त्यांना हे दर कमी करण्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यानुसार त्यांनी 15 कोटी 48 लाख 50 हजार रुपये इतका सुधारीत दर सादर केला. महाराष्ट्र शासनाच्या सन 2018-19 च्या दरसूचीनुसार टेसिंटग चार्जेस, आरसीसी डिझाईन चार्जेस, सिमेंट व स्टील फरक आणि रॉयल्टी चार्जेससह या कामाची किंमत 16 कोटी 20 लाख 47 हजार 722 रुपये 25 पैसे इतकी येते. त्यामुळे एम्पायर इस्टेटसमोरील उड्डाणपुलाला चिंचवडच्या बाजूने चढण्या-उतरण्यासाठी रॅम्प बांधण्याचे काम मेसर्स व्ही. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्‍चर यांच्याकडून करून घेण्यात येणार आहे. याला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली आहे.

विरोधी पक्षांचे मौन
नुकताच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात बैठक घेतली आणि चुकीच्या, पालिकेतील वाढीव कामांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घ्या, अशा सूचना केलेल्या असताना स्थायी समितीच्या बैठकीत मात्र अशी कोणतीही भूमिका घेतलेली दिसली नाही. तर विरोधी पक्षांच्या या मौनाबाबत चांगलीच चर्चा मात्र पालिकेत रंगलेली पहायला मिळाली.

निविदेची प्रक्रिया
28 फेब्रुवारी 2018 रोजी निविदा प्रसिद्ध
13 कोटी 99 लाख 58 हजारांची “लमसम’ निविदा
एकाच ठेकेदाराची निविदा प्राप्त
ठेकेदाराचा मूळ निविदा दर 15 कोटी 80 लाख 55 हजार 546 रुपये
महापालिकेकडून दर कमी करण्याबाबत ठेकेदाराशी तिनवेळा पत्रव्यवहार
कामासाठी येणारा खर्च 15 कोटी 79 लाख 63 हजार रुपये
14 कोटींचे काम 16 कोटींवर जाणार

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.