Ramnivas Goyal – दिल्ली विधानसभेचे मावळते सभापती रामनिवास गोयल यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती पत्करली आहे. त्या निर्णयासाठी ७६ वर्षीय गोयल यांनी वृद्धापकाळाचे कारण दिले. गोयल हे आपच्या तिकिटावर दोनवेळा आमदार बनले. ते २०१५ यावर्षापासून सभापतिपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. दिल्ली विधानसभेची निवडणूक अवघ्या २ महिन्यांवर येऊन ठेपली आहे.
अशात गोयल यांनी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना पत्राद्वारे त्यांचा निर्णय कळवला. मी सभापती आणि आमदार म्हणून १० वर्षे जबाबदारी सांभाळली. मला मिळालेल्या सन्मानाबद्दल अतिशय आभारी आहे. आता वयामुळे मी निवडणुकीच्या राजकारणापासून दूर होऊ इच्छितो. यापुढेही आपमध्येच राहून मी कार्य करत राहीन, असे त्यांनी पत्रात नमूद केले.
गोयल यांच्या निर्णयावर केजरीवाल यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली. गोयल यांच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. तो निर्णय आमच्यासाठी भावनिक क्षण आहे. गोयल यांनी निर्णयाची कल्पना दिली होती. आप परिवारासाठी ते मार्गदर्शक असतील, अशी भावना केजरीवाल यांनी व्यक्त केली.