बर्लिन – भारताचा अव्वल टेनिसपटू रामकुमार रामनाथन याने एकेंटल चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याने उपांत्यपूर्व सामन्यात रशियाच्या एव्हगेनी दोनस्कोयचा 6-2, 6-1 असा सहज पराभव केला.
गेल्या मोसमापासून रामकुमारने आपल्या कामगिरीत परिपूर्ण सातत्य राखले असून या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्याची किमया करणारा रामकुमार गेल्या काही मोसमातील पहिलाच भारतीय टेनिसपटू ठरला आहे. त्याने हा सामना केवळ 57 मिनिटांत जिंकला.
पहिला व दुसरा सेट मिळून त्याने केवळ 3 गेमच गमावल्या व संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखले. जागतिक क्रमवारीत 206 व्या स्थानावर असलेल्या रामकुमारची यंदाच्या मोसमातील सर्वोच्च कामगिरी असून या विजयाने त्याने सहा क्रमांकांनी प्रगती करत 200 वे स्थान मिळवले आहे.