तुरुंगात असलेले रमेश कदम सापडले ठाण्यातील घरी

लाखोंचा मुद्देमालदेखील जप्त

मुंबई : अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आर्थिक घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले रमेश कदम हे त्यांच्या ठाण्यातील घरात सापडल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी कारवाई केली तेव्हा रमेश कदम यांच्यासोबत लाखो रुपयांची रक्कमही सापडली. ही रक्कम 53 लाख रुपये ईतकी असल्याची सूत्रांची माहिती आहे. निवडणूक आयोग विभाग आणि ठाणे गुन्हे शाखा युनिट एक यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत हे घबाड हाती लागले. रमेश कदम यांच्यासह आणखी एक व्यक्तीही पोलिसांना या ठिकाणी सापडली.

रमेश कदम यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत पुढे आले की, रमेश कदम हे सध्या तुरुंगात आहेत. परंतू, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी त्यांना जेजे रुग्णालयात करण्यासाठी नेण्यात आले होते. मात्र, जेजे रुग्णालयात तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा कारागृहात नेण्याऐवजी पोलीस इस्कॉर्ट पार्टी अधिकारी आणि कर्मचारी यांनी मिळून त्यांना एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरी नेले. दरम्यान, रमेश कदम थांबले असलेल्या इमारतीवर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीमध्ये रामेश कदम, लाखो रुपयांची रोख रक्कम आणि आणखी एक व्यक्ती सापडले. पोलिसांनी रमेश कदम, संबंधित व्यक्ती आणि रोख रक्कम ताब्यात घेतली.

दरम्यान, रमेश कदम यांच्याकडून ताब्यात घेतलेली रोख रक्कम निवडणूक आयोगाने आयकर विभागाकडे सोपवण्यात आली आहे. ही रक्कम कोणाची होती, नेमक्‍या कोणत्या कारणासाठी आणला होती, या रकमेचा स्त्रोत काय? इतक्‍या पैशांसोबत रमेश कदम तेथे काय करत होते? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळू शकली नाहीत. मात्र, वैद्यीकय तपासणी पूर्ण झाल्यानंतर रमेश कदम यांना पुन्हा कारागृहात आणण्याऐवजी नियमभंग करत त्यांना खासगी ठिकाणी नेल्याप्रकरणी पोलीस इस्कॉर्ट पार्टी मधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे समजते.

रमेश कदम हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक जिंकले होते. त्यांच्याकडे अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्षपद होते. दरम्यान, या महामंडळात घोटाळा केल्याच्या आरोपाखाली रमेश कदम यांची चौकशी सुरु आहे. सध्या त्यांची रवानगी तुरुंगात असून, तुरुंगातूनच ते सध्या अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक  लढवत आहेत. अण्णाभाऊ साठे महामंडळात आरोप झाल्यानंर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने रमेश कदम यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.