विविधा: रमेश देव

माधव विद्वांस

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे आज अभिष्टचिंतन. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे 30 जानेवारी 1929 रोजी झाला. ते मूळचे राजस्थानातील जोधपूरचे, ठाकूर घराण्यातील. राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे त्यांचे नाव “देव’ झाले. एका न्यायालयीन कामकाजात रमेश देव यांच्या वडिलांनी महाराजांना मदत केली होती त्यावेळी महाराज म्हणाले, तुम्ही ठाकूर नाही तर देव आहात, तेव्हापासून देव हे नाव रूढ झाले. रमेश देव यांचा विवाह प्रसिद्ध अभिनेत्री सीमा यांच्याबरोबर झाला व पडद्यावर आणि आयुष्यातही जोडी जमली.

रमेश देव आणि सीमा देव चित्रपटात असतील तर तो चित्रपट आवर्जून बघितला जायचा. रमेश देव 91 वर्षांचे असून त्यांच्या विवाहाला 57 वर्षे झाली आहेत. वर्ष 1957मध्ये “आलिया भोगासी’ या मराठी चित्रपटाद्वारे सीमा व रमेश देव यांनी प्रथम एकत्रित काम केले. त्यानंतर 6 वर्षांनंतर 1 जुलै 1963 रोजी त्यांचा विवाह झाला. सीमा या पूर्वाश्रमीच्या कर्नाटकातील नलिनी सराफ तर रमेश देव मूळचे राजस्थानी; पण ही जोडी कोल्हापूरच्या मराठी मातीत अस्सल मराठीच म्हणून ओळखली जाते.

त्यांचे वडील पृथ्वीराज कपूरचे फॅन होते. एकदा छोट्या रमेशला घेऊन पृथ्वीराज कपूर यांच्या सेटवर गेले होते. त्यावेळी सेटवर काम करणाऱ्या छोट्या मुलाकडून दिग्दर्शकाचे समाधान होईना, तेवढ्यात त्यांचे लक्ष छोट्या रमेशकडे गेले. त्यांनी विचारले, बेटा तू काम करणार का? छोट्या रमेशने होकार दिला व हेच त्यांचे चित्रपटसृष्टीतील पहिले काम. मात्र त्यांनी लगेचच अभिनयाची सुरुवात केली नाही. त्यांनी नाटकात कामे केली. वर्ष 1951 मध्ये “पाटलाची पोर’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा काम केले. त्यांनी राजा परांजपे दिग्दर्शित “आंधळा मागतो एक डोळा’ या वर्ष 1956 मधील मराठी चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. वर्ष 1962मध्ये राजश्री प्रॉडक्‍शनच्या “आरती’ या चित्रपटाद्वारे त्यांनी एक खलनायक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

त्यांनी 30 मराठी नाटके, 190च्या वर मराठी व 285च्या वर हिंदी चित्रपटांतून काम केले. त्यांनी नायक, खलनायक म्हणून कारकीर्द यशस्वी केली. “भिंगरी’ चित्रपटात त्यांनी साकारलेला खलनायक प्रेक्षकांच्या जास्त लक्षात राहिला. “आनंद’ चित्रपटामधील राजेश खन्ना बरोबरील त्यांची डॉक्‍टरांची भूमिकाही सुरेख होती. त्यांनी अनेक चित्रपट, माहितीपट आणि दूरदर्शन मालिकेचे दिग्दर्शन केले.

वर्ष 2006मध्ये त्यांनी छोट्या पडद्यावर “निवडुंग’ या मराठी मालिकेत काम केले. त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांची दोनही मुले अजिंक्‍य व अभिनय चित्रपटसृष्टीतच कार्यरत आहेत. त्यांना 11व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पीआयएफएफ) जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा शंभरीचा वाढदिवस साजरा होवो हीच सदिच्छा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.