शहिद जवानांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार – रामदास आठवले

बुलडाणा: पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारीला झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहिद झालेल्या ४० जवानांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरचे संजयसिंग राजपूत आणि लोणार तालुक्यातील नितीन राठोड दोन शहीद जवानांचा समावेश आहे. तसेच दि. 6 फेब्रुवारीला सियाचीन येथे सीमेवर झालेल्या चकमकीत शहिद झालेले चिखली तालुक्यातील अनिल वाघमारे या तीन शहिदांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली. यावेळी त्यांनी शहीदांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली. या तिन्ही शहिदांच्या गावात त्यांचे योग्य स्मारक उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रामदास आठवले यांनी यावेळी दिले.

दिल्लीहून मुंबई आणि मुंबईतून शालिमार एक्सप्रेसने रामदास आठवले यांनी दि. 21 रोजी भल्या पहाटे मलकापूर गाठले. मलकापूर मधील शहिद जवान दिवंगत संजयसिंग राजपूत यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर चिखली येथील शहीद जवान अनिल वाघमारे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. शहिद अनिल वाघमारे याना सियाचीन येथे वीरगती प्राप्त झाली. त्यांना प्रज्वल हा केवळ तीन महिन्यांचा मुलगा आहे. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून ना रामदास आठवले लोणार तालुक्यातील गोवर्धननगर या गावातील शहिद नितीन राठोड यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. शहिद नितीन राठोड आणि सर्व शहिदांना भावपुर्ण श्रद्धांजली ना रामदास आठवले यांनी वाहीली. बुलडाण्यातील या तिन्ही शहिदांच्या गावात त्यांचे स्मारक उभारण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी आपण चर्चा करणार आहोत तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी ही चर्चा करणार असल्याचे ना रामदास आठवले यांनी यावेळी आश्वासन दिले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)