पुणे – लिचीसारखे दिसणाऱ्या बाहेरून टणक आणि आतून गोड गरे असणाऱ्या रामबुतान फळाची मार्केटयार्डातील फळविभागात आवक सुरू झाली आहे. या फळाला चांगली मागणी असून घाऊक बाजारात प्रतिकिलोस 300 रुपये भाव मिळत आहे. तर किरकोळ बाजारात 400 ते 450 रुपयांपर्यंत विक्री केली जात आहे.
येथील बाजारात केरळ येथून रामबुतान या फळाची आवक होत आहे. हंगाम नुकताच सुरू झाल्यामुळे आठवड्यातून फक्त तीन दिवसच या फळाची आवक होत आहे. सुमारे 800 किलो इतकी आवक एका दिवशी होते. मार्केटयार्डातील नामदेव विष्णू म्हेत्रे यांच्या गाळ्यावर ही आवक होत आहे. या फळाचे उत्पादन केरळ भागात घेतले जाते. जुलै ते डिसेंबर या कालावधीपुरता या फळाचा हंगाम असतो. पुढील काही दिवसांत अवाक मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यानंतर रामबुतानचे भाव कमी होतील, अशी माहिती फळांचे व्यापारी मधुकर म्हेत्रे यांनी दिली. दरम्यान, सर्व फळे ही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. परंतु, रामबुतान फळात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी, कॉपर, प्रोटीन, आयर्न आढळून येते. त्याचबरोबर शंभर ग्रॅम रामबुतान फळांमध्ये फक्त 84 कॅलरी आढळून येतात. या व्यतिरिक्त या फळांमध्ये ऍन्टीऑक्सिडंट गुण असल्याचे सांगितले जाते.