रॅमन मॅगसेसे हा मानाचा पुरस्कार जाहीर झालेले: भारत वाटवानी 

रॅमन मॅगसेसे हा मानाचा पुरस्कार यंदा ज्या दोन भारतीयांना जाहीर झाला, त्यामधील एक आहेत भारत वाटवानी. वाटवानी हे मुंबईतील मानसोपचार तज्ञ आहेत. कर्जतजवळ त्यांनी श्रद्धा फौंडेशनचे काम सुरू केले. रस्त्यांवर बेवारस हिंडणाऱ्या मनोरुग्णांना त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्याचे काम भारत वाटवानी यांच्या या स्वयंसेवी संस्थेने हाती घेतले आहे. वाटवानी आणि त्यांची पत्नी स्मिता वाटवानी यानी 1989 साली या संस्थेची सुरुवात केली. आतापर्यंत या संस्थेने 7000 पेक्षा अधिक मानसिक रुग्णांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवले आहे. यापैकी बहुतेक जण उत्तर प्रदेश, महारष्ठ्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, पश्‍चिम बंगाल, गुजरात, बिहार, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूचे होते. यापैकी 6 मानसिक रुग्ण तर मूळचे नेपाळचे होते. त्यांनाही घरी सुखरुप पोहोचवण्यात आले आहे. या कामाची सुरूवात करण्याची प्रेरणा वाटवानी यांना एका मनोरुग्ण युवकामुळे झाली. लांब वाढलेले केस, अस्ताव्यस्त कपडे असलेला हा युवक रस्त्याच्या कडेने वाहणारे घाणेरडे पाणी पीत होता. ते पाहून वाटवानी यांचे हृदय गलबलले आणि त्यांनी या मनोरुग्णाची काळजी घेण्याचे ठरवले. उपचारानंतर त्या रुग्णाची ओळख उघड झाल्यावर वाटवानी यांना धक्काच बसला. तो युवक बी.एससी पदवीधर आणि वैद्यकीय तंत्रज्ञ होता. त्याचे वडील आंध्रप्रदेशात अधिक्षक होते. हा युवक स्क्रीझोफ्रेनियाने ग्रस्त होता.
त्याला घरी पोहोचवल्यानंतर वाटवानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे काम सुरूच ठेवले. त्यांच्या श्रद्धा फौंडेशनच्या पुनर्वसन केंद्रामध्ये असे 120 भटकलेले मनोरुग्ण आहेत. या केंद्रात अशा मनोरुग्णांची राहण्याची, भोजनाची सर्व व्यवस्था केली जाते. तसेच समांतरपणे त्यांच्या कुटुंबियांनाही शोधले जाते. अनेकवेळेस कुटुंबियांनी आपली नातेवाईक पुन्हा मिळण्याची अपेक्षा सोडून दिली असते. त्यांनाही हा एक सुखद धक्काच असतो. या वर्षभरात असे 485 जण घरी पोहोचवण्यात आलेले आहेत. स्क्रीझोफ्रेनियासारख्या मानसिक आजाराबाबत भारतात जागरुकता कमी आहे. त्यावर उपचारासाठी नियमित औषधोपचार आणि देखरेख आवश्‍यक असते. मात्र रॅमन मॅगासेसे पुरस्कारामुळे या कामाची आंतरराष्ट्रीय समुदायाकडून दखल घेतली जाईल आणि जागरुकताही होईल, अशी आशा डॉ. वाटवानी यांना वाटते. आपल्याला या कामाची प्रेरणा बाबा आमटे यांच्याकडून मिळाल्याचे ते आवर्जुन सांगतात. स्वतःला एक कन्या असतानाही वाटवानी दाम्पत्याने दोन मुले आणि एक कन्या दत्तक घेतली आहेत.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)