जेव्हा राम नाईकांना सलग दोनदा पराभव पचवावा लागला होता…  

राम नाईक आणि राम कापसे या जोडगोळीने 1980 ते 89 या काळात राज्याची विधानसभा आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी आणि संसदपटूत्त्वाने गाजवली. लोकहिताचे अनेक प्रश्‍न या जोडगोळीने आपल्या ज्ञानाच्या आणि हुशारीच्या जोरावर सरकारला कायदे संमत करायला लावून सोडवायला लावले. 1989 मध्ये राम नाईक यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात कॉंग्रेसचे अनुपचंद शहा हे होते. जनता दलाच्या मृणाल गोरे याही रिंगणात होत्या.

रामभाऊंची प्रतिमा अभ्यासू लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक कामांसाठी सतत आग्रही असणारा कार्यकर्ता अशी होती. मुंबईच्या उपनगरी रेल्वे प्रवाशांचे प्रश्‍न असोत की कष्टकऱ्यांचे; रामभाऊ हे असे प्रश्‍न सरकार दरबारी मांडण्यात सतत आघाडीवर असायचे. शिवसेनेची साथ आणि वैयक्‍तिक प्रतिमा या जोरावर रामभाऊंनी 1989 मध्ये त्या मतदारसंघातून विजय मिळवला.

1989 ते 2004 अशी सलग 15 वर्षे रामभाऊंनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व केले. त्यांचे मताधिक्‍य प्रत्येक निवडणूक वाढतच होते. 2004 मध्ये त्यांच्या विरोधात कॉंग्रेसकडून अभिनेता गोविंदा याला उमेदवारी दिली गेली. गोविंदा याला उमेदवारी द्यावी म्हणून एका उद्योगसमूहाने बराच पुढाकार घेतला होता, अशी चर्चा त्यावेळी होती. गोविंदाने रामभाऊंना 40 हजार मताधिक्‍याने पराभूत केले. मात्र गोविंदाला निवडून दिल्याचा पश्‍चाताप या मतदारसंघातील जनतेला झाला. कारण गोविंदाने निवडून आल्यानंतर पुन्हा दर्शनच दिले नाही. 2009 च्या निवडणुकीत रामभाऊंनी या मतदारसंघातून पुन्हा नशीब आजमावले.

मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराने लाखापेक्षा अधिक मते मिळवल्यामुळे रामभाऊंना कॉंग्रेसच्या संजय निरुपम याच्याकडून अवघ्या सहा हजार मतांनी पराभूत व्हावे लागले. जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी सतत कार्यरत असणारा रामभाऊंसारखा कार्यकर्ता सलग दोन निवडणुकीत पराभूत होतो, याचे दुःख महाराष्ट्रातील अनेकांना झाले. नंतरच्या काळात उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदी त्यांची वर्णी लागली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)