लखनौ – ‘रामाचे भक्तच, दानपेटीवर डल्ला मारू लागलेत, आता काय करणार…” असं म्हणत समाजवादी पक्षाचे खासदार व सरचिटणीस राम गोपाल यादव यांनी आज राम जन्मभूमी ट्रस्टने केलेल्या जमीन खरेदी व्यवहारातील कथित भ्रष्टाचारारून निशाणा साधला आहे.
राम जन्मभूमी ट्रस्टने एक भूखंड चढ्या भावाने खरेदी केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. यानंतर, ट्रस्टतर्फे जमीन खरेदीचा व्यवहार पूर्णपणे पारदर्शक असून हे आरोप दूषित हेतून प्रेरित असल्याचं म्हंटलं होत.
नेमकं काय म्हणाले राम गोपाल यादव
“रामाचे भक्तच, दानपेटीवर डल्ला मारू लागलेत, आता काय करणार… हे प्रकरण बाहेर काढल्यानंतर त्यांनी पत्रकारांना व याविरोधात आवाज उठवणाऱ्यांना धमकवण्यास सुरुवात केली आहे. निर्लज्जपणाची पण एक सीमा असते. एक तर तुम्ही भ्रष्टाचार उघडकीस आणणारी कागदपत्र खोटी आहेत हे सान्गा किंवा चौकशी लावा.” अशी मागणी यादव यांनी केली.
राजकीय वातावरण तापले
नंतर या कथित घोटाळ्यावरून राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. तर भाजपतर्फे हा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप लागवण्यात आलेला.
महाराष्ट्रात देखील पडसाद
महाराष्ट्रात शिवसेनेने याबाबत भूमिका मांडताना, सरसंघचालक व विश्व हिंदू परिषदेने याबाबतची भूमिका मांडावी असे सुचवले होते. यानंतर मुंबई येथे भाजप व शिवसेना कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं देखील पाहायला मिळालं होत.