राम मंदिर भूमिपूजनाची निमंत्रण पत्रिका पहिल्यांदाच आली समोर

मोदींसह , आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत हे विशेष अतिथी म्हणून राहणार उपस्थित

नवीदिल्ली – सध्या अयोध्यानगरी रामनामाच्या भक्तिसागरात तल्लीन झाली आहे. अयोध्येत येत्या 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराचे भूमिपूजन केले जाणार आहे. यासाठी अयोध्येत सर्वत्र मोठ्या प्रमाणात जोरदार तयारी सुरु आहे. अयोध्येतील प्रत्येक गल्ली, प्रत्येक कोपरा आणि प्रत्येक भिंतीची रंगरंगोटी करण्याचे काम चालू आहे तसेच भूमिपूजनादिवशी प्रभू रामाला नवीन पोशाख घालण्यात येणार असून त्याचीदेखील तयारी करण्यात आली आहे.

या सोहळ्याची निमंत्रण पत्रिकाही समोर आली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराचे येत्या ५ ऑगस्ट रोजी साडे ११ वाजता भूमीपूजन करतील. या सोहळ्यासाठी आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील, असे या निमंत्रण पत्रिकेत म्हटले आहे.

निमंत्रण पत्रिकेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबतच उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच निमंत्रक म्हणून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्यावतीने अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांच्या नावाचा निमंत्रण पत्रिकेत समावेश आहे.

दरम्यान, राम मंदिराच्या निर्माणासाठी भूमीपूजनावेळी चांदीची वीट देखील तयार करण्यात आली आहे.त्यासोबतच प्रभू राम आणि त्यांची भावंडे लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांना भूमीपूजन सोहळ्याच्या निमित्ताने रत्नजडित कपडे घालण्यात येणार आहेत. प्रभू रामाला त्यादिवशी हिरव्या रंगाचा पोशाख घालण्यात येईल, कारण भूमीपूजन बुधवारी होणार असून त्यादिवशी हिरवा रंग शुभ मानला जातो असं कपडे शिवणाऱ्या भगवत प्रसाद यांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.