मुंबई – एस एस राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटाचे रिलीज झाल्यापासून सर्वत्र कौतुक होत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत अनेक नामी अवॉर्ड पटकावले आहेत.आर आर आरला दोन श्रेणींमध्ये गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाल्यानंतर चित्रपटाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. मात्र आता जुनिअर एनटीआर आणि राम चरण हे आता थेट हॉलिवूडमधील टॉम क्रूझ आणि ब्रॅड पिटला टक्कर देणार आहेत.
आर आर आर या चित्रपटातील अभिनेते राम चरण आणि ज्युनियर एनटीआरला क्रिटिक्स चॉईस सुपर अवॉर्डमध्ये ऍक्शन चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले आहे. नुकतीच या अवॉर्ड संदर्भातील नामांकन जाहीर करण्यात आली. हॉलिवूडमधील आणखी दोन दमदार अभिनेत्यांना देखील यासाठी नामांकन मिळाले आहे. बुलेट ट्रेन’साठी ब्रॅड पिट आणि टॉप गन: मेवरिक’ साठी टॉम क्रूझ यांनाही या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळाले आहे.
पुढील महिन्यात म्हणजेच 16 मार्च रोजी विजेत्या अभिनेत्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. बाहुबली फेम एस एस राजामौली यांचा आर आर आर हा सिनेमा साऊथ इंडस्ट्रीमधील सर्वात बिग बजेट चित्रपट होता. बाहुबली नंतर राजामौली यांनी पुन्हा एकदा ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करत अजय देवगण,राम चरण,एनटीआर अशी तगडी स्टारकास्ट मोठ्या पडद्यावर एकत्र आणली होती. त्यामुळेच सर्वत्र आर आर आरचा बोलबाला पाहायला मिळाला होता. ऑस्कर यादीत स्थान पटकावल्यानंतर या चित्रपटाने गोल्डन अवॉर्डवर देखील आपली मोहर उमटवली होती.