अमरावती – तिरुपती मंदिरातील भेसळयुक्त लाडू प्रकरणाने कोंडीत सापडलेले आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी शुक्रवारी सत्ताधारी पक्ष टीडीपी आणि मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला. सध्या राज्यात राक्षसी राजवट सुरू आहे, अशी प्रखर टीका त्यांनी केली आहे.
सरकार माझ्या आगामी तिरुमला मंदिराच्या भेटीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे. मंदिर भेटीसंदर्भात पोलिसांनी राज्यभरातील वायएसआरसीपी नेत्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
नोटीसमध्ये म्हटले आहे की तिरुमला मंदिराच्या भेटीला परवानगी नाही आणि वायएसआरसीपीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आवश्यक मान्यता नाही परिणामी, नेत्यांना त्या कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी नाही असे जगनमोहन यांनी म्हटले आहे.
जगन मोहन रेड्डी यांनी तिरुपती बालाजी मंदिराची भेट रद्द केल्यावर त्यांचे हे वक्तव्य आले आहे. ते आज शुक्रवारी सायंकाळी मंदिरात जाणार होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव आणि त्यांच्या श्रद्धेबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांमुळे त्यांनी भेट रद्द केली.
भाजपलाही केले लक्ष्य
जगन मोहन रेड्डी पुढे म्हणाले, एकीकडे ते माझ्या मंदिराच्या दर्शनात अडथळा आणण्यासाठी नोटिसा बजावत आहेत, तर दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते इतर ठिकाणांहून राज्यात येत आहेत आणि अनेक ठिकाणी पोलीस मोठ्या संख्येने तैनात आहेत.
भाजपच्या नेतृत्वाला याची जाणीव आहे की नाही हे मला माहिती नाही. राजकीय लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी प्रसादाचा मुद्दा उपस्थित केला आहे. ते खोटे बोलत आहेत.
माझ्या जातीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. मी घरी बायबल वाचतो आणि हिंदू, इस्लाम आणि शीख धर्माचा आदर करतो. मी मानवतेच्या समुदायाशी संबंधित आहे. संविधान काय म्हणते? मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीच्या एका व्यक्तीला जर मंदिरात प्रवेश दिला जात नसेल तर मग दलितांना कसे वागवले जाईल, असा माझा सवाल आहे.