रक्षाबंधनही ऑनलाइन

सवलतींचा वर्षाव

रक्षाबंधनानंतर भावाकडून बहिणीला भेटवस्तू दिली जाते. त्यामुळे, सध्या बाजारापेठेत भेटवस्तुंवर आकर्षक सवलती देण्यात आल्या आहेत. यामध्ये, गृहोपयोगी वस्तू, इलेक्‍ट्रिक उपकरणे याबरोबरच इतर वस्तूंवर सवलती देण्यात आल्या आहेत. तसेच, सध्या बाजारपेठेत जाऊन खरेदीपेक्षा अनेकांचा ऑनलाइन खरेदीकडे कल वाढला आहे. रक्षाबंधन सणाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन मार्केटींग करणाऱ्या कंपन्यानी रक्षाबंधनासाठी विशेष सवलती दिल्या आहेत. याचा स्थानिक लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना मात्र फटका बसला आहे. विशेषतः काही वर्षांपूर्वी रक्षाबंधनाच्या आठवडाभर आधीच भेटवस्तू घेण्यासाठी गिफ्ट आर्टिकल्सच्या दुकानात दिसणारी मोठी गर्दी आता दिसेनाशी झाली आहे.

पिंपरी – बहीण-भावाच्या अतूट नात्याची आठवण करुन देणारा रक्षाबंधन सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावर्षी रक्षाबंधन गुरुवारी स्वातंत्र्यदिनीच साजरा होत आहे. त्यामुळे, या दुहेरी उत्सवाचे औचित्य साधून राखी, भेटवस्तू व इतर साहित्याच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये बहीण-भावाची वर्दळ होताना दिसत आहे. परंतु सध्याच्या ऑनलाईनच्या जमान्यात रक्षाबंधनालाही आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे.

शिक्षण, नोकरी, किंवा व्यवसायानिमित्त एकमेकांपासून दूर असलेले बहीण-भाऊ रक्षाबंधनही वेगवेगळ्या साईट्‌सच्या मदतीने साजरे करत आहेत. विशेष म्हणजे आयटी हब आणि बड्या महाविद्यालयांमुळे पिंपरी-चिंचवड शहरात देशभरातून तरुण नोकरी आणि शिक्षणासाठी आलेले आहेत. ही तरुणाई राखी आणि भेटवस्तू दोन्ही ऑनलाइन बुक करत आहेत.

गेल्या काही वर्षांत बदलत्या काळानुसार अनेक पारंपरिक सण साजरे करण्याचा ट्रेंडच बदलला आहे. याच ट्रेंडनुसार आता रक्षाबंधन सणही पारंपरिक पद्धतीबरोबरच हायटेक पद्धतीने साजरा केला जात आहे. उच्चशिक्षण, व्यवसाय व नोकरीनिमित्ताने बाहेरगावी असलेले बहीण-भाऊ हायटेक पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा करीत आहेत. वेबकम व्हिडीओ-कॉलिंग, व्हॉट्‌स अप व्हिडीओ, गुगल ड्युओच्या माध्यमातून रक्षाबंधन सण साजरा केला जात आहे, बहिणीकडून ऑनलाइन राखी पाठवली जात आहे. तर गिफ्ट देण्यासाठी भावाकडून ऑनलाईन पे-ऍपचा वापर केला जात आहे. त्यामुळे, ऑनलाईन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तरुणाई आपली परंपरा जपण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.

सध्या सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे वेगवेगळ्या ऍपच्या माध्यमातून रक्षाबंधनाची शुभेच्छापत्रे, शुभेच्छा मेसेज पाठवण्यावर बहीण-भावांचा कल आहे. पूर्वी बहीण स्वतः दुकानात जाऊन राखी निवडत असे आणि ती पॅक करुन कुरियर करत असे. भाऊ देखील स्वतः गिफ्ट निवडून बहिणीला पाठवत असे. आता कित्येक साईट्‌सवर सध्या राख्या आणि भेटवस्तू उपलब्ध आहेत. फक्‍त आपल्याला हवी असलेली राखी किंवा भेटवस्तू निवडायची आणि ऑनलाइन पेमेंट करायचे. ऑनलाइन कंपन्याच राखी आणि भेटवस्तू थेट भावा-बहिणीपर्यंत पोहच करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.