मुंबई – ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची काही दिवसांपूर्वी भाजप नेते मोहित कंबोज यांनी अभिनेत्री राखी सावंतसोबत तुलना केली होती. या तुलनेला सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर देत राखीची तुलना थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याशी केली. यावर आता अभिनेत्री राखी सावंतने संताप व्यक्त केला आहे.
राखीने एक व्हिडीओ शेअर करत राजकीय नेत्यांवर टीका केली आहे. “तुम्ही ड्रामेबाज असून, तुम्हाला मीडिया हवी आहे. तुम्हाला लाज असायला हवी. जी मुलगी 15-20 वर्षापासून एवढी मेहनत करून पुढे आली आहे. तिचं नाव वापरून तुम्ही वादात राहत आहात. तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. पण तुमच्यावर मला हसू येते. राखी सावंतचं पुन्हा नाव घेताना विचार करा,” असेही राखी सावंतने सांगितले.
पुढे ती म्हणाली, “माझ्याबद्दल बोलण्यापूर्वी मेहनत घेतली पाहिजे. स्वत:च्या चुली पेटवून त्यावर भाकरी शेका. दुसऱ्यांच्या चुलीत कशाला नाक खुपसता. थोडी लाज वाटू द्या. नाटक तुमचे लोक करतात, कोणी खुर्ची वाचवण्यासाठी तर कोणी खुर्चीवर बसण्यासाठी नाटक करतात. पण आमच्या नावाचा वापर का करता?,” असा संतप्त सवाल राखीने केला आहे.
काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे ?
“कंबोजचं इन्टेनशन हीज इंटेन्शन वॉज नॉट गुड… त्याचं इंटेन्शन जर चांगलं असतं तर त्यानं राखी सावंतची तुलना आणखी कोणाशीतरी केली असती. कारण बिचारी राखी सावंत जी आहे तिचं क्षेत्र गायन, मॉडलिंग, डान्सिंग… काय तिचा मेकओव्हर, काय तिचा तो लूक…फोटोशूट अन् काय-काय भानगडी असतात, आम्ही आमच्या आयुष्यात फोटोशूट कधी केलं?”
“दहावी आणि बारावीच्या हॉलतिकिटासाठी फोटो काढताना. यापलीकडे आम्हाला फोटोचं काही माहीतच नाही. जर त्या बिचाऱ्या माऊलीची तुलना होऊ शकत असेल, तर तिच्या क्षेत्रानुसार तुलना ही आमच्या अमृता वहिनींसोबत होईल.”
“आमच्या राखीताईंची सर्जरी झाली चेहऱ्याची… आमच्या अमृता वहिनींचीही झालीये… आमच्यी राखीताई सिंगर आहे… आमच्या अमृता वहिनीही सिंगर आहे… आमची राखीताई मॉडेल आहे… आमच्या अमृता वहिनीही मॉडेल आहेत,” असे सुषमा अंधारे म्हणाल्या.