भुबनेश्वर – राज्यसभा खासदार व प्रख्यात शिल्पकार रघुनाथ मोहपात्रा (७८) यांचं आज निधन झालं ( Raghunath Mohapatra ). करोनाची बाधा झाल्याने त्यांना २२ एप्रिल रोजी भुबनेश्वर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. मात्र आज उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
“डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही आज रघुनाथ मोहपात्रा ( Raghunath Mohapatra ) यांचे दुपारी ३ वाजून ४९ मिनिटांनी निधन झाले”, अशी माहिती भुबनेश्वर एम्स रुग्णालयाच्या संचालिका डॉ. गीतांजली बतमानबने यांनी दिली.
मोहपात्रा यांना त्यांच्या कार्यासाठी पद्म भूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होत. त्यांच्या निधनानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आदींनी शोक व्यक्त केला.
“मोहपात्रा हे ओडिशाच्या कला आणि वारसा क्षेत्रात त्यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल नेहमीच लक्षात राहतील. मी त्यांच्या शोकग्रस्त कुटुंबीयांप्रती सहानुभूती व्यक्त करतो. त्यांच्या आत्मा शांती लाभो,” असा संदेश ओडिशाचे मुख्यमंत्री पटनाईक यांनी ट्विटरद्वारे दिला आहे.