Rajya Sabha Election : आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून संभाव्य उमेदवारांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पक्षाच्या अंतर्गत बैठकीत माजी खासदार सुबोध मोहिते, अविनाश आदिक आणि प्रमोद हिंदुराव यांच्यासह आणखी एका नावावर प्राथमिक स्तरावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या काही दिवसांत पक्षश्रेष्ठी उमेदवाराच्या नावावर अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. राज्यसभेच्या या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून महाराष्ट्रातीलच स्थानिक आणि पक्षनिष्ठ चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यामुळे परराज्यातील किंवा बाहेरील चेहऱ्याऐवजी राज्यातील अनुभवी नेत्याला दिल्लीत पाठवण्याचा पक्षाचा कल असल्याचे समजते. यामुळे सुबोध मोहिते पाटील आणि अविनाश आदिक यांच्या नावांना अधिक वजन प्राप्त झाले आहे. हेही वाचा – देशात राज्यसभा निवडणुकांची रणधुमाळी; एनडीएला बसणार धक्का, काँग्रेसला मिळेल बळ दरम्यान, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे देखील राज्यसभेवर जाण्यास इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, पक्ष नेतृत्व सध्या त्यांना केंद्रातील राजकारणात पाठवण्याबाबत फारसे उत्सुक नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे भुजबळ यांच्या नावाची शक्यता तुलनेने कमी मानली जात आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने देशातील १२ राज्यांतील २६ राज्यसभा जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एका जागेचाही समावेश आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यसभेचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत महायुतीचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता संख्याबळाच्या आधारे मजबूत मानली जात आहे. राज्याच्या विधानसभा संख्याबळाचा विचार करता महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा सहज राखता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता पक्ष कोणत्या चेहऱ्यावर विश्वास दाखवतो, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ८ जून असून, १८ जून रोजी मतदान होणार आहे.