आंबेगाव बुद्रुक – भारतीय जनपा पक्षाच्या माध्यमातून समाजाकारण करताना योग्य वेळ आली की, सर्व काही मिळते त्यामुळे अरूण राजवाडे यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण व्हाव्यात त्यांनी प्रामाणिकपणे काम करत रहावे, त्यांना लवकरच आणखी मोठ्या पदावर संधी मिळेल, असे विश्वास आमदार भीमराव तापकीर यांनी व्यक्त केला.
पुणे शहर भाजपा उपाध्यक्ष व माजी सरपंच आंबेगाव बुद्रुक अरुण राजवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत आरोग्य व रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आमदार तापकीर बोलत होते. ते म्हणाले की, समाजातील आरोग्य व्यवस्था समस्या गंभीर असून ग्रामीण भागातही शासकीय आरोग्य व्यवस्था तोकडी पडत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे नागरिक आजार अंगावर काढतात, अशा परिस्थितीत वाढदिवसाच्या अनाठायी खर्च टाळून आरोग्य शिबिराचे आयोजन करणे हा राजवाडे यांचा स्तुत्य उपक्रम आहे.
यावेळी आयोजित मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 500 पेक्षा जास्त नागरिकांनी रक्तदान केले तर 4500 पेक्षा जास्त नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. शहरातील रुग्णालयाचे भरमसाठ असणारे दर सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नसल्यामुळे सेवा व समरपण या हेतूने वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याचे तसेच आपल्या रक्तदनमुळे कोणचा तरी जीव वाचतो, या उदात्त हेतूने रक्तदान केले असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितल्याने शिबिराचे सार्थक झाल्याचे अरुण राजवाडे यांनी सांगितले. याप्रसंगी खडकवासला आमदार भीमराव तापकीर, नगरसेविका वर्षा तापकीर, राणीताई भोसले, राजश्री नवले, संतोष ताठे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.