सातारा – कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मार्च 2020 मध्ये सातारा येथील राजवाड्या समोर चौपाटीवरील खाद्यपदार्थांचे व्यवसाय बंद करण्यात आले होते. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी खाद्यपदार्थांच्या व्यावसायिकांसाठी चौपाटी पुन्हा सुरू करण्याचे आदेश पालिकेला दिले असल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली.
येथील राजवाड्या समोर असणार्या चौपाटीवर अनेक खाद्यपदार्थ, चायनीज, आईस्क्रीम, ओली – सुकी भेळ, पावभाजी, अंडा – भुर्जी, भजी, वडापाव, चहा विक्रेते यांचे गाडे लागत असत. चौपाटी ही खवय्यांसाठी पर्वणी ठरली होती. विशेषत: सायंकाळी सहानंतर या ठिकाणाला जत्रेचे स्वरूप प्राप्त व्हायचे. चौपाटीवरील खाद्यपदार्थांच्या व्यवसायामुळे अनेकांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालत होता. मात्र मार्च 2020 मध्ये सातारा शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे चौपाटी बंद करण्याची वेळ खाद्यपदार्थांच्या व्यावसायिकांवर आली होती. तब्बल एक वर्ष झाले, चौपाटीवरील व्यवसाय बंद असल्यामुळे कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवायचा असा प्रश्न खाद्यपदार्थ व्यावसायिकांना पडला होता.
व्यावसायिकांनी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे भेट घेऊन खाद्यपदार्थांसाठी चौपाटी सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत सातारा विकास आघाडीचे पक्षप्रतोद अॅड. डी. जी. बनकर, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनीही सहभाग घेतला. बैठक झाल्यानंतर प्रसिद्धी-माध्यमांशी बोलताना मनोज शेंडे म्हणाले, चौपाटी येथे व्यवसाय करणार्या खाद्य व्यावसायिकांना यापूर्वी आळूचा खड्डा येथे पर्यायी जागा दिली होती. मात्र ती जागा पसंत न पडल्यामुळे व्यवसायिकांनी तेथे खाद्यपदार्थांचे गाडे लावले नाहीत.
संबंधित व्यवसायिकांनी आज खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन चौपाटी पुन्हा सुरू करण्याबाबत साकडे घातले. चर्चेअंती काही नियम व अटी पाळण्याच्या शर्तीवर चौपाटी सुरू करण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत. चौपाटीवर व्यवसाय करणार्या व्यावसायिकांचे अनेक गाडे आहेत, मात्र अशा व्यावसायिकांना एकच गाडा लावण्याची मुभा देण्यात आली आहे. एकापेक्षा अनेक गाडे लावल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा देऊन शेंडे पुढे म्हणाले, चौपाटी सुरू झाल्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून साफसफाई उत्तमरित्या करण्याच्या सूचना उदयनराजे भोसले यांनी दिल्या आहेत.