शक्तीप्रदर्शनाने राजू शेट्टी यांचा अर्ज दाखल

कोल्हापूर – करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेस-राष्ट्रवादी-स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आघाडीच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला आहे.

मालमत्तेत दीड कोटींची वाढ
गेल्या पाच वर्षात नवी कोणतीही मालमत्ता खरेदी केली नसताना देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या मालमत्तेत 1 कोटी 52 लाख 60 हजार 263 रुपयांची वाढ झाली आहे. शेट्टी यांनी सादर केलेल्या विवरण पत्रात ही माहिती दिली आहे. त्यांची 2014ला एकूण मालमत्ता 83 लाख 87 हजार 70 होती. ती आता 2019ला 2 कोटी 36 लाख 47 हजार 333 इतकी झाली आहे. टक्केवारीचा विचार करता त्यांच्या मालमत्तेत तिप्पट वाढ झाली आहे.

भव्य रॅलीत राजू शेट्टी यांच्यासोबत किसान संघटनेचे नेते योगेंद्र यादव, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, कॉंग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, स्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर व कार्यकर्ते-पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे राजू शेट्टी यांनी बैलगाडीतून मिरवणूक काढुन आपला अर्ज भरला.

दुपारी एकच्या सुमारास दसरा चौक येथून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करुन अर्ज दाखल करण्यासाठी खा. शेट्टी सजवलेल्या बैलगाडीतून रॅलीने निघाले. तत्पूर्वी त्यांनी अंबाबाई मंदीरात जाऊन दर्शन घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.