शेतात 107 आंब्याची रोपे लावून राजू शेट्टी यांनी साजरा केला कृषीदिन

कोल्हापूर (प्रतिनिधी) – : कृषिक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी 1 जुलै कृषिदिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा वसंतराव नाईक यांची 107 वी जयंती आहे. याच पार्श्वभूमीवर 107 व्या जयंतीनिम्मीत्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या शेतामध्ये 107 आंब्यांची रोपे लावून आजचा दिवस कृषीदिन म्हणून साजरा केला.

हरितक्रांतीचे जनक, राज्याचे 11 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या वसंतराव नाईक यांची आज 107 वी जयंती असून त्यांनी कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी उल्लेखनिय काम केले. त्यामुळे महाराष्ट्र राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाल्याचे राजू शेट्टी यांनी म्हंटले.

यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले, संकरीत वाणाच्या गाई, म्हशींची पैदास करून वसंतराव नाईक यांनी त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचविल्या. एव्हढेच नाही तर दूध डेअरींच्या मार्फत शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय सुद्धा त्यांनी उभारून दिला. त्यांनी आपल्या कार्यकाळात कापूस एकाधिकार योजना राबवित कापूस खरेदीतील दलाली बंद करून शेतकऱ्यांच्या हातात अधिकाधिक पैसा कसा जाईल यासाठी प्रयत्न केले. चिकू, द्राक्षे, केळी, संत्री, लिंबू, मोसंबी आदी फळपिकांवर संशोधन करून शेतकऱ्यांना फळपिकांकडे आकर्षित केले. त्यांनी आपल्या 1952 ते 1979 या सत्ताविस वर्षाच्या कार्यकाळात शेती विषयक अनेक महत्वपूर्ण योजना राबविल्याचे सुद्धा शेट्टींनी म्हंटले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.