मुंबई – राजकारणात पद मिळालं की, राजकीय पुढाऱ्यांना आवश्यक त्या सुविधा मिळण्यास सुरुवात होते. अनेक नेत्यांकडे आधीचपासूनच गाड्यांचा ताफा असतो. तर काही नेते पदावर विराजमान झाले की आवश्यक सर्व गोष्टीची पूर्तता करून घेतात. मात्र शेतकरी प्रश्नांवर कायम आक्रमक असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना जनतेने लोकवर्गणी करून गाड्या भेट दिल्या.
राजू शेट्टी मागील अनेक वर्षांपासून कोल्हापूर आणि सांगली परिसरात शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत. येथील जनतेमध्ये ते चांगलेच लोकप्रिय आहेत. याच प्रेमापोटी सांगली आणि कोल्हापूरमधील लोकांनी राजू शेट्टी यांना वर्गणी काढून अलिशान कार भेट दिली आहे. या संदर्भाती माहिती, खुद्द राजू शेट्टी यांनी आपल्या फेसबुकवरून दिली.
राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत म्हटलं की, धन्यवाद सांगली-कोल्हापूरकर. आजपर्यंत कोणालाही विकलो गेलो नाही. इथून पुढेही विकलो जाणार नाही. चळवळीत आणि राजकारणात काम करत असताना जनतेशी प्रामाणिक राहिल्याबद्दल तुम्ही लोकवर्गणीतून जे बक्षिस दिलं आहे त्याचा मी कृतज्ञपुर्वक स्वीकार करतो. राजू शेट्टी यांना जनतेने वर्गणी काढून टॉयोटाची अलिशान कार भेट दिली असून तिची किंमत 40 लाख रुपये आहे.
दुसरीकडे रविकांत तुपकर यांनी देखील फेसबुकवर फोटो शेअर करत जनतेने गाडी भेट दिल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर तुम्ही जे निर्व्याज प्रेम करत आहात, ते पाहून मी अंतर्मनातून भारावून गेलो आहे. माझ्या आंदोलनाला बळ आणि चळवळीला गती देण्यासाठी मित्रपरिवाराने, शेतकरी बांधवानी व कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीतून काल मला ‘इनोव्हा क्रिस्टा’ गाडी भेट दिली. बुलडाण्यातील मित्रपरिवाराने माझ्या चळवळीतील संघर्षाबद्दल ‘कृतज्ञता सोहळा’ केला. या लोकवर्गणीतून दिलेल्या गाडीची पूजा स्व.राणा चंदन यांच्या पत्नी किरण चंदन व आई शांताबाई चंदन यांच्या हस्ते करण्यात आली. या सोहळ्यात क्षणोंक्षणी मला स्व.राणा चंदन यांची उणीव भासली.