नवी दिल्ली – सुपरस्टार रजनीकांत हे ब्लड प्रेशरच्या समस्येमुळे शुक्रवारी हैदराबाद येथील अपोलो रूग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज देतेवेळी डाॅक्टरांनी रजनीकांत यांना आरोग्यसंदर्भात कोणतीही गंभीर समस्या नसल्याचे सांगितले आहे.
डाॅक्टरांनी रजनीकांत यांना कोणत्याही प्रकारचे प्रेशर न घेण्याचा सल्ला दिला असून करोनाच्या धोक्यामुळे कमी प्रमाणात बाहेर जाण्याचे सांगितले आहे. रजनीकांत यांचा बीपी नाॅर्मल असून पहिल्यापेक्षा अधिक उत्तम स्थितीत असल्याचेही डाॅक्टरांनी सांगितले.
दरम्यान, शुक्रवारी रक्तदाबात चढ-उतार झाल्यानंतर रजनीकांत यांना हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. 13 डिसेंबरपासून त्यांचे चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. त्यांची करोना तपासणी देखील करण्यात आली आहे. मात्र, त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे. रजनीकांत रूग्णालयात दाखल झाल्याचे समजताच राजकीय क्षेत्रासह मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी ते लवकर बरे व्हावेत यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनीही रजनीकांत यांच्याशी फोनवर चर्चा करून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली होती. तसेच रजनीकांत लवकर बरे व्हावेत यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.