नवी दिल्ली- दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या 75 व्या विजयदिनानिमित्त रशियात मॉस्को येथे येत्या 24 जून रोजी होणाऱ्या विजयी पथसंचलनाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत. रशिया आणि इतर मित्र राष्ट्राच्या सैनिकांनी या युद्धात गाजवलेले शौर्य आणि बलिदानाचा गौरव करण्यासाठी हे पथसंचलन आयोजित करण्यात आले आहे. रशियाचे संरक्षण मंत्री सरगी शोईगू यांनी राजनाथ सिंह यांना या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे. आधी हे पथसंचलन 9 मे रोजी होणार होते, मात्र कोविड-19 मुळे हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला.
त्याशिवाय, भारताच्या तिन्ही सेवादलांच्या 75 सैनिकांचे संयुक्त पथक या पथसंचलनात सहभागी होण्यासाठी आधीच मॉस्को येथे पोहोचले आहे. या विजय पथसंचलनात सहभागी होणाऱ्या भारतीय तुकडीचे नेतृत्व शीख लाईट ईनफ्रंट्री रेजिमेंटचे मेजर दर्जाचे अधिकारी करणार आहे. ही रेजिमेंट दुसऱ्या जागतिक महायुद्धात अत्यंत शौर्याने लढली होती. या युद्धात गाजवलेल्या पराक्रमाबद्दल या रेजिमेंटला चार युद्धसन्मान आणि दोन मिलिटरी क्रॉस देऊन गौरवण्यात आले होते.
या युद्धात रशिया आणि इतर राष्ट्रांनी केलेल्या बलिदानाला आदरांजली अर्पण करण्यासाठी भारतीय सैनिकांचे पथकही सहभागी होत आहे. भारतीय सैन्यानेही, या युद्धात अतुलनीय पराक्रम गाजवला होता.