370 कलम ही राज्यघटनेतील भळभळणारी जखम होती

पाकिस्तानने चुकांची पुनरावृत्ती करू नये- राजनाथ सिंह

पाटणा – जम्मू काश्‍मीरशी संबंधित 370 कलम ही राज्यघटनेतील भळभळणारी जखम होती. यामुळे आमच्या हृदय आणि भूलोकावरील स्वर्ग असलेले काश्‍मीरही रक्‍तबंबाळ झाले होते, असे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. कलम 370 रद्द केले जावे, अशीच मागणी आम्ही पहिल्यापासून केली होती. हे स्वप्न आम्ही स्वातंत्र्यानंतर 72 वर्षांनी सत्यात उतरताना बघत आहोत, असेही राजनाथ सिंह म्हणाले.

370 कलम ही तात्पुरती तरतूद आहे. हे कलम स्वतःचे अस्तित्व आपोआपच गमावेल, असे देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले होते. मात्र हे कलम पुढे 69 वर्षे अस्तित्वात राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच 370 कलम रद्द केले गेले.

जम्मू आणि काश्‍मीरमध्ये पसरलेला दहशतवाद याच 370 कलमामुळे पसरला गेला होता. स्वातंत्र्यानंतरच्या याच दहशतवादामुळे तब्बल 41,500 लोकांना आपले प्राण गमवायला लागले. तर 5,500 सुरक्षा रक्षक आपले कर्तव्य बजावताना शहिद झाले, असेही राजनाथ सिंह म्हणाले. आगामी पाच वर्षात जम्मू काश्‍मीरचा कायापालट केला जाईल.जम्मू काश्‍मीर पुन्हा एकदा पृथ्वीवरील स्वर्ग झाल्याचे बघायला मिळेल, अशी ग्वाहीही राजनाथ सिंह यांनी दिली.

पाकिस्तानने 1965 आणि 1971 च्यावेळी ज्या चुका केल्या, त्याची पुनरावृत्ती करू नये. अन्यथा पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरची काय स्थिती होईल, याची कल्पना केली जाऊ शकते. जर बलुचिस्तान आणि सिंधमधील नागरिकांना अयोग्य वागणूक दिली तर पाकिस्तान तोंडघशी पडेल, असा इशाराही राजनाथ सिंह यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.