Rajnath Singh । One Nation, One Election । Lok Sabha Election 2024 – लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घ्यायच्या असा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला असल्याचे संरक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
येथील एका प्रचारसभेत बोलताना ते म्हणाले की कधी लोकसभा, तर कधी विधानसभा तर कधी अन्य कोणती निवडणूक असे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सतत सुरू आहे.
सगळ्यांच पक्षांना निवडणूक जिंकायची असते. मात्र भाजप हा एकमेव असा पक्ष आहे की जो सरकार बनवण्यासाठी नाही तर देश घडविण्यासाठी निवडणूक लढतो असा दावा त्यांनी केला.
त्यामुळेच संपूर्ण देशात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या पाहिजेत आणि हे काम पुढच्या पाच वर्षांत आम्ही पूर्ण करू असे ते म्हणाले.
एका अन्य ठिकाणी झालेल्या प्रचारसभेत राजनाथ म्हणाले की स्वतंत्र भारताला पुढे घेऊन जाण्यात सगळ्याच सरकारांचे योगदान आहे. तथापि, वेगाने विकास करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्यांत पुढे आहेत. जगसुध्दा आता भारताचे म्हणणे कान उघडे ठेवून ऐकते.
लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. पुढील दहा वर्षांत देशातील गरीबी संपुष्टात आणण्यात सरकारला यश मिळेल.
लोकांच्या पाठबळावर मोदी २०४७ पर्यंत केवळ विकसित भारत करणार नाहीत तर भारताला महाशक्ती करतील. २०१४ पूर्वी भारताची अर्थव्यवस्था जगात ११ व्या स्थानावर होती. आता आपण मोठी उडी मारून पाचव्या स्थानावर आलो आहोत असेही राजनाथ यांनी सांगितले.