सातारा – सातारा शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे फायबर स्ट्रक्चर शहराच्या प्रवेशद्वारांवर उभे करून, त्याला “थ्री-डी इफेक्ट’ देण्याबाबत नाशिकचे प्रसिद्ध तज्ज्ञ संजीव खत्री यांनी पालिकेत याबाबत प्रात्यक्षिके सादर केली. शहराच्या सुशोभिकरणासाठी स्वतः राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भातील बैठक नगराध्यक्ष माधवी कदम यांच्या दालनात गुरुवारी झाली.
खा. उदयनराजे भोसले यांच्या सूचनेवरून शहराच्या ऐतिहासिक वास्तूंना झळाळी देणे व त्यांच्यामध्ये रेखीवपणा आणण्यासाठी फायबर स्ट्रक्चर उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नाशिकचे प्रसिद्ध तज्ज्ञ संजीव खत्री यांनी गुरुवारी नगराध्यक्ष माधवी कदम यांच्या दालनात थ्री-डी प्रात्यक्षिके सादर केली. राजमाता कल्पनाराजे यांनी पुढाकार घेत ही बैठक घडवून आणली.
उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, बांधकाम समिती सभापती सिद्धी पवार, नियोजन समिती सभापती स्नेहा नलावडे, महिला व बालकल्याण समिती सभापती रजनी जेधे, नगरसेवक किशोर शिंदे, श्रीकांत आंबेकर, ऍड. डी. जी. बनकर, स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक, मुख्याधिकारी अभिजित बापट, नगर अभियंता दिलीप चिद्रे, अभियंता सुधीर चव्हाण, पंकज चव्हाण उपस्थित होते.
शहराची प्रवेशद्वारे, राजवाडा, गोलबाग, कमानी हौद, नगर परिषदेची प्रस्तावित इमारत, शिवतीर्थ, गोडोली तळे या ऐतिहासिक वास्तूंचे वैभव वाढविण्यासाठी फायबर स्ट्रक्चर उभारण्यासंदर्भात खत्री, संजीव मिस्त्री आणि त्यांच्या टीमशी चर्चा करण्यात आली. हे स्ट्रक्चर मजबूत, देखणे असल्याचे मिस्त्री यांनी सांगितले. या वास्तूंचे आराखडे खत्री यांनी सादर केले. फायबर स्ट्रक्चरच्या सजावटीमुळे शहराचा चेहरामोहरा बदलून शहराच्या वैभवात भर पडेल, असा विश्वास सौ. कदम यांनी व्यक्त केला.