राजीव सातव अनंतात विलीन; कळमनुरीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

हिंगोली : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी पुण्यातील रुग्णालयात उपचारांदरम्यान अखेरचा श्वास घेतला. राजीव सातव यांच्या निधनाने राज्य आणि देशाच्या राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात आली. सोमवारी त्यांच्यावर हिंगोलीतील कळमनुरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबतच इतरही मोठ्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची हजेरी कळमनुरी येथे पाहायला मिळाली.

राजीव सातव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यावेळी त्यांचा मुलगा पुष्कराज याने मुखाग्नी दिला. यावेळी अंत्यसंस्कारांपूर्वी कळमनुरी येथे उपस्थित नेतेमंडळींनी सातव यांना आदरांजली वाहिली. अंत्यसंस्कारांसाठीच्या चौथऱ्यावर त्यांचे पार्थिव ठेवण्यासाठी नेण्यात आले तेव्हा कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. राजकारणातील अभ्यासू आणि सुसंस्कृत व्यक्ती, अशी त्यांची ओळख होती.

दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर हिंगोली सारख्या एका छोट्याश्या जिल्ह्यातून पंचायत समिती सदस्य ते थेट खासदार अशी अत्यंत कमी वयात राजीव सातव यांनी मजल मारली. उच्चशिक्षित, अभ्यासू आणि आक्रमक बाणा असलेले राजीव सातव यांनी काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मोठं योगदान दिले.

उच्च विचारसरणी आणि साधी राहणीमान या धोरणाने काँग्रेस पक्षात त्यांनी आपले मोठे वजन निर्माण केले होते. पक्षातही युवक काँग्रेसचे सरचिटणीस, प्रदेश अध्यक्ष ते युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष अशी पद त्यांनी भूषवली. शिवाय सध्या ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निमंत्रित सदस्यही होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.