करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरातील सिनेमांचे शुटिंग बंद आहे. त्यामुळे सिनेतंत्रज्ञ आणि सहकलाकारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. बॉलीवूडप्रमाणेच दक्षिण भारतातील सिनेसृष्टीतही या सहकलाकार आणि तंत्रज्ञांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
या सहकलाकार आणि तंत्रज्ञांची संघटना असलेल्या “फिल्म एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ साऊथ इंडिया’ला मोठे आर्थिक सहकार्य देण्याचा निर्णय सुपरस्टार रजनीकांत यांनी घेतला आहे. त्यांनी या संघटनेच्या नावे 50 लाख रुपयांची देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
देशातील करोनाबाधितांची संख्या वाढत असताना शुटिंग सुरू ठेवून कलाकार, सहकलाकार, तंत्रज्ञ, सहाय्यक आणि वेगवेगळ्या स्कीलसाठीचे इंजिनिअर, सेट डिझायनर, मेकअप आर्टिस्ट आणि स्टंट आर्टिस्ट यांना कामावर यायला लावल्याने त्यांनाही संसर्ग होण्याची शक्यता होती. म्हणूनच सर्व शुटिंग तात्पुरती थांबवण्यात आली आहेत. या सर्व सहकलाकारांच्या उपजीविकेची काळजी लक्षात घेऊन रजनीकांत यांनी 50 लाख रुपयांची देणगी दिली आहे. आपल्या दातृत्वाचे दर्शन रजनीकांत यांनी यापूर्वीही दाखवून दिले आहे. आता रजनीकांत यांच्याप्रमाणे आणखी कोण कलाकार पुढे येतात हे बघूया.