रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर – राजगुरुनगर येथील पाबळ रोड वरील आयडीबीआय बँकेला आज पहाटे आग लागल्याने बँकेतील सर्व कागदपत्रे, वस्तू जळून भस्मसात झाल्या आहेत शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
याबाबतची प्राथमिक माहिती अशी, राजगुरुनगर येथील पाबळ रोड येथे गावडे हॉस्पिटल शेजारी आयडीबीआय बँकेची शाखा आहे. आज दि.२८ पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बँकेला भीषण आग लागली. या आगीत कागदपत्रे, फर्निचर, संगणक, प्रिंटर व इतर साहित्य जळून खाक झाले. घटनास्थळी तात्काळ अग्निशामक बंब आल्याने पुढील मोठी दुर्घटना टळली.
अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अर्धा तासात आग आटोक्यात आणली. या आगीत किती रुपयांचे नुकसान झाले आहे. याचा तपशिल समजू शकलेला नाही. ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून पंचनामा करण्याचे काम सुरु आहे.