राजगुरूनगर : ऐन ग्रामपंचायत निवडणुकीत 54 नावे वगळली, येणवे बु. गावकऱ्यांकडून प्रशासनाचा निषेध

मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा शिवसेनेचा आरोप

राजगुरूनगर(प्रतिनिधी) : ऐन ग्रामपंचायत निवडणुकीत 54 नावे वगळल्याने येणवे बु (ता. खेड ) गावातील नागरिकांनी प्रशासनाचा निषेध ऐन ग्रामपंचायत निवडणुकीत 54 नावे वगळल्याने केला आहे. निवडणुकीत समर्थकांना सोयीस्कर व्हावे यासाठी तालुक्यातील 70 टक्के गावात असा राजकीय हस्तक्षेप झाल्याने अशा सर्वच मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. 

तक्रार दाखल असलेल्या मतदारांची ही नावे विधानसभा निवडणुकीत जशी होती त्याप्रमाणे मतदार यादीत समाविष्ट करून निवडणूक घ्यावी अशी मागणी या शिष्टमंडळाने प्रांत अधिकारी विक्रांत चव्हाण यांना गुरुवारी (दि ३१) भेटुन केली आहे.

माजी खासदार तथा सेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार खेड तालुकाप्रमुख रामदास धनवटे, जिल्हा संपर्क नेत्या विजयाताई शिंदे,शिवाजी वरपे, विजय शिंदे, उर्मिला सांडभोर, अर्चना सांडभोर आदींनी प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली त्यानंतर राजगुरूनगर येथील शिवसेना भवन मध्ये पत्रकार परिषद घेतली.

येणवे बु .आणि येणवे खु. अशी दोन गावांच्या सीमेवर हे 54 मतदार राहतात. बुद्रुक ची निवडणूक आहे. तर खुर्दची व्हायला अवकाश आहे. प्रभागात या मतदानाचा प्रभाव असलेल्या गटाकडून समाविष्ट करण्यासाठी आग्रह आहे. सध्या होत असलेल्या निवडणुकीसाठी विधानसभा निवडणुकीत वापर झालेली मतदार यादी कायम करण्यात आली आहे. हे मतदार पुर्वी होते तसेच ठेवावेत असा समर्थकांचा आग्रह आहे. तर विरोधी गटांच्या नागरिकांनी त्याला आक्षेप घेतला आहे.

मतदान काहीच दिवसांवर आल्याने 54 मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागेल. त्यावरून गावात टोकाचा वाद निर्माण होऊ शकतो म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी  अधिकाऱ्यांकडे तक्रार मांडली.गेली 15 वर्षे हे नागरिक येणं वे बु.मध्ये वास्तव्यास आहेत. तसे पुरावे असून याच गावात वेळोवेळी मतदानही केले आहे. असे रामदास धनवटे यांनी पुरावे देत पत्रकारांना सांगितले.

1 डिसेंबरला  प्रारूप यादी होताना 54 नावे होती. हरकती झाल्यावर स्थळ पाहणी झाली. 14 डिसेंबरला वगळण्यात आली. कोणत्याही प्रकारच्या नोंदी नसताना 29 रोजी पुन्हा नावे समाविष्ट झाली असल्याचे तक्रारदार सांगत आहेत. तर मंडळ अधिकारी, तलाठी यांनी पंचनामा केला. त्यावेळी ही नावे विधानसभा निवडणुकीच्या वेळी या गावात नव्हती असे निदर्शनास आल्याने बुधवारी (दि 30) ही नावे वगळली आहेत.

याबाबत शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक विजया शिंदे म्हणाल्या, येणवे खुर्द गावातील मतदारांची मतदार यादीतील नावांबाबत प्रांताधिकाऱ्यानी ढोस भूमिका घेतली नाही. मतदार नावे मतदार यादीतून वगळणे, पुन्हा लावणे, पुन्हा वगळणे ही निवडणूक आयोगाची दिशाभूल आहे. तर मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार येणवे खुर्द गावात घडला आहे. निवडणूक आयोगाचा अधिकाऱ्यांनी खेळ खंडोबा लावला आहे. यामध्ये नेमके अधिकारी खोडसाळ आहेत कि त्यांच्यावर कोणावर दबाव आहे  हे कळत नाही यात राजकीय डावपेच आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही तक्रार नोंदवली आहे. मतदारांना त्यांच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही यासाठी शिवसेना लढा उभा करेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.