राजेश टोपेंचे जनतेला कळकळीचे आवाहन; म्हणाले लॉकडाऊन….

मुंबई – राज्यात करोना रुग्णांची संख्या आता वाढत आहे. त्यामुळे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांनीच करोनाच्या संबंधातील निर्बंध काटेकोरपणे पाळावेत. नागरीकांच्या प्रतिसादाचा पुढील आठ दिवस अभ्यास करून लॉकडाऊन विषयीचा निर्णय घेतला जाईल, असे म्हंटले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयातून महाराष्ट्राच्या जनतेला पत्राद्वारे कळकळीचे आवाहन केले आहे.

काय आहे राजेश टोपे यांचे पत्र ?

गेल्या वर्षभरापासून आपण करोना विरुध्दची लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका, ठोस उपाययोजना व प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक करोनायोद्धे, विशेषतः डॉक्टर, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलीस, स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण करोना नियंत्रित करु शकलो.

मात्र अद्यापही कारोना गेलेला नाही. तो पुन्हा डोके वर काढत आहे. तेव्हा पुन्हा एकदा सामूहिक लढाई लढावी लागणार आहे. मी सध्या हॉस्पिटलमध्ये करोनाविरुध्द लढतो आहे. गेल्या वर्षभरापासून करोना विषाणू माझा पाठलाग करत होता. मी राज्यातील अनेक भागात गेलो, करोना हॉटस्पॉटला भेटी दिल्या, परंतु करोनाला माझ्या जवळ येणे जमले नाही, पण अखेर त्याने मला गाठलेच. मात्र आपल्या सदभावना, प्रेम यामुळे त्याला हरवून मी पुन्हा एकदा करोना विरुध्दच्या सामूहिक लढाईत सहभागी होणार आहे.

समजदार, संवेदनशील व सहकार्य करणारे लोक ही आपल्या राज्याची वेगळी ओळख आहे. म्हणूनच लॉकडाऊन काळात सर्व जनतेने करोना संकटाचा अत्यंत संयमाने सामना केलेला आपण पाहिला. मात्र आता पुन्हा लॉंकडाऊन परवडणारे  नाही. लॉकडाऊन टाळणे केवळ आणि केवळ आपल्याच हाती आहे. तेव्हा आपणास माझे कळकळीचे आवाहन राहिल की, मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा व लॉकडाऊन टाळा.

शेवटी स्वत:ची काळजी म्हणजेच कुटुंबातील प्रिय व्यक्तींची काळजी आणि प्रिय व्यक्तींची काळजी म्हणजेच समाजाची काळजी. तेव्हा चला तर हरवूया करोनाला, ‘एकजुटीने, एकमताने, एकनिर्धाराने, असे आवाहन राजेश टोपे जनतेला केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.